सानपाडावासीयांनी अनुभवला कला-क्रीडा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:04 AM2020-02-07T00:04:27+5:302020-02-07T00:04:46+5:30
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचा संकल्प
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सानपाडा येथे नुकतेचे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय महोत्सवात शाळकरी मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या वेळी दहाहून अधिक स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मुलांमध्ये मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. परिणामी, केवळ संगणक व मोबाइलसोबत जोडले गेल्याने हालचालीअभावी शरीराच्या व्याधीही उद्भवत आहेत. यामुळे देशाच्या भावी पिढीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यावर मात करून विद्यार्थ्यांमध्ये बुद्धीला चालना देणारे व मैदानी खेळांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न सानपाडा येथे करण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी सूर्यराव यांच्या वतीने या कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध, चित्रकला, बुद्धिबळ, कॅरम, वक्तृत्व, फुटबॉल आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १४ वर्षांखालील व १४ वर्षांवरील वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यामध्ये सानपाडा सिडको वसाहत परिसरातील विद्यार्थ्यांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रत्येक गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या वेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा प्रामुख्याने उपस्थित होते. त्याशिवाय शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, विभागप्रमुख सुनील गव्हाणे, संदेश चव्हाण, अजय पवार, अुतल डेरे, वंदना चौगुले, वंदना गोडसे, वैभवी पांचाळ, सावित्री चौगुले आदी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत सिद्धेश काळे याने उपस्थितांची मने जिंकून स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावला. सानपाडा परिसरासाठीच घेण्यात आलेल्या या क्रीडा व कला महोत्सवात बुद्धिबळात १३० हून अधिकांनी तर फुटबॉलमध्ये २८ संघांनी सहभाग घेतला होता. यावरून विद्यार्थी व तरुणांमध्ये खेळांविषयी आवड असल्याचे दिसून आल्याचा आनंद महोत्सवाचे आयोजक मिलिंद सूर्यराव यांनी व्यक्त केला.