सानपाडा स्टेशन महिलांसाठी असुरक्षित
By admin | Published: July 27, 2015 02:40 AM2015-07-27T02:40:22+5:302015-07-27T02:40:22+5:30
सानपाडा रेल्वे स्थानकात भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांनी संपूर्ण स्टेशन परिसरावर कब्जा केला आहे. दिवसागणिक या स्थाकातून हजारो प्रवासी
प्राची सोनवणे , नवी मुंबई
सानपाडा रेल्वे स्थानकात भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांनी संपूर्ण स्टेशन परिसरावर कब्जा केला आहे. दिवसागणिक या स्थाकातून हजारो प्रवासी प्रवास करतात. यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र या ठिकाणी कोणत्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. स्टेशन इमारतीमधील काही रिकामे हॉलचा धर्मशाळेप्रमाणे वापर केला जातो. कोणीही, कधीही या ठिकाणी येऊन राहतात तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी वेश्याव्यवसाय
चालत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
वाशी एपीएमसी येथील घाऊक बाजारात जाण्यासाठी या स्थानकाबाहेरुन मार्ग असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. स्थानकाखाली असलेल्या भुयारी मार्गाची आणि तिथल्या रस्त्याची झालेली अवस्था, खड्डे यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात होतात. भुयारी मार्गापासून ते स्थानकापर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर फेरीवाले आपले दुकान मांडून बसले आहेत त्यामुळे येथील प्रवाशांची अडवणूक होते. फेरीवाले, विक्रेते या ठिकाणी टाकाऊ पदार्थ, उष्टे-खरकटे, केरकचरा, खराब झालेल्या वस्तू जागीच टाकून निघून जातात. त्यांनी केलेला कचऱ्यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरलेली आहे.
सिडको, रेल्वे प्रशसनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने, दिवसेंदिवस फेरीवाल्यांचे प्रमाण वाढते आहे.
या ठिकाणी असलेल्या पाणपोईचीही दुरवस्था झाल्याने गळतीची धार लागली आहे. त्यामुळे हे पाणी फलाटावर साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक शौचालये वापरात नसून फक्त नावापुरतीच मर्यादित राहिली आहे. संपूर्ण स्टेशन परिसराच्या समस्या पाहता सिडको व रेल्वे प्रशासनाला केव्हा जाग येणार, हा प्रश्न उभा राहतो.