पेंटाग्राफच्या आगीमुळे झालेल्या सहा स्फोटांनी हादरले सानपाडा स्थानक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:28 AM2021-02-20T00:28:16+5:302021-02-20T00:28:37+5:30
Sanpada station : गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकात गुरुवारी रात्री लोकलच्या पेंटाग्राफला लागलेल्या आगीमुळे झालेल्या सहा स्फोटांनी स्थानक हादरले होते. या स्फोटांच्या आवाजाने प्रवाशांची पळापळ सुरू झाली होती. या वेळी प्रसंगावधान राखत ऑपरेटिंग विभागाच्या एका कर्मचाऱ्याने वेळीच उद्घोषणा करायला लावल्याने संभाव्य चेंगराचेंगरी टळली.
गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला. यामुळे रेल्वे थांबण्यापूर्वीच प्रवाशांनी बॉम्बस्फोट झाल्याची शक्यता वर्तवत रेल्वेतून उड्या मारून पळायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सलग दोन स्फोट झाले. यामुळे नेमके काय घडत आहे हे कळत नसल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. यादरम्यान काही जण रूळ ओलांडून पळू लागल्याने अपघाताची शक्यता होती. शिवाय रेल्वेतून बाहेर पळणाऱ्यांमध्ये महिला, लहान मुलांसह वृद्धदेखील असल्याने त्यांना दुखापतीची शक्यता होती. फलाटांवर उडालेला हा गोंधळ एका ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ उद्घोषणा कार्यालयात जाऊन तातडीने उद्घोषणा करण्याची सूचना केली. त्यानुसार ‘पेंटाग्राफला लागलेल्या आगीमुळे स्फोट झाले असून, प्रवाशांनी घाबरू नये,’ अशी उद्घोषणा ऐकल्यानंतर प्रवाशांच्या जीवात जीव आला.
यानंतर बेलापूरची लोकल गेली असता, तीनच मिनिटांत वडाळ्याला जाणारी लोकल स्थानकात प्रवेश करीत असतानाच तिच्याही पेंटाग्राफला आग लागून सलग तीन स्फोटांचा आवाज आला. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांनीही भीतीपोटी रेल्वेतून उड्या मारून पळायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा उद्घोषणा करून परिस्थिती हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर तब्बल अर्ध्या तासाने ही लोकल स्थानकातून वडाळ्याच्या दिशेने निघाली.
छताच्या गळतीमुळे पेंटाग्राफला आग
सानपाडा स्थानकावरील छताला काही ठिकाणी फटी आहेत. त्यामधून पावसाच्या साचलेल्या पाण्याचा झरा थेट पेंटाग्राफवर पडत होता. यामुळे पेंटाग्राफला आग लागून स्फोट झाले. प्रतिवर्षी पावसाळ्यात या फटींमधून पाण्याच्या धारा कोसळत असतात. यानंतरदेखील थेट पेंटाग्राफवर पडणारे पाणी कसे थांबवता येईल, याचा विचार प्रशासनाकडून झालेला नाही.