नवी मुंबई - वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सहा मोटारसायकल, एक कार व ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, असा सहा लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंब्रा व रबाळे पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.शहरातील रस्त्यालगत उभी असणारी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार सुरूच आहेत, त्यामध्ये शहराबाहेरील टोळ्यांसह स्थानिक गुन्हेगारांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यानुसार कोपरखैरणे पोलिसांनी परिसरात घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान संशयित गुन्हेगारांवर पाळत ठेवली होती, त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक जी.डी. देवडे यांचे पथक तपास करत होते. त्यामध्ये हवालदार सचिन कदम, सतीश वाघमोडे, सुरज बावीस्कर, गणेश गिते, प्रसाद काजळे, नितीन पाटील व अमृत साळी यांचा समावेश होता. त्यांना काही तरुणांच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवली असता ते वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. यानुसार चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जिशान शफिक आझमी (२१), सुरज हणमंत खंडागळे (२२) व नावेद अब्दुल गणी शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत. ते अनुक्रमे घणसोली, कोपरखैरणे व बोनकोडे येथील राहणारे आहेत. तपासात त्यांच्याकडून सातपेक्षा अधिक गुन्ह्यांची उघड करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील सहा मोटारसायकल, एक कार व ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सहा लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अनेक दिवसांपासून ही टोळी कोपरखैरणे व घणसोली परिसरात वाहनचोरी करत होती. त्यांच्यावर यापूर्वी रबाळे व मुंब्रा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
सराईत वाहनचोर टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:07 AM