सराईत वाहनचोराला अटक
By admin | Published: May 7, 2016 12:47 AM2016-05-07T00:47:09+5:302016-05-07T00:47:09+5:30
पनवेल परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात
नवी मुंबई : पनवेल परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हा चोरटा बीडचा राहणारा असून गुन्ह्यासाठी पनवेल परिसरात यायचा.
खांदेश्वर परिसरात सोने विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला असता अमोल बळे (२८) याला अटक करण्यात आली.
पनवेल परिसरात त्याने मोटारसायकल चोरीसह घरफोडीचे देखील गुन्हे केल्याचे परिमंडळ २ चे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. बळे हा बीड जिल्ह्यातील साबलखेड गावचा राहणारा असून घरालगतच त्याचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांमध्ये लागणाऱ्या पार्टसाठी तो वाहनांची चोरी करायचा. याकरिता तो पनवेल परिसरात येवून मोटारसायकली चोरून त्या बीडला घेवून जायचा. अशाप्रकारे त्याने ३० हून अधिक वाहनांची चोरी केल्याची शक्यता आहे. त्यापैकी ६ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ९ मोटारसायकली जप्त केल्याचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. चोरीची वाहने गॅरेजमध्येच ठेवायचा. या दरम्यान दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारसायकलसाठी चोरीच्या मोटारसायकलचे पार्ट वापरायचा. (प्रतिनिधी)