पनवेल : पनवेलरेल्वेस्थानकात सरकत्या जिन्याच्या कामाला सुरु वात झाली आहे. सरकता जिना असणारे नवी मुंबईतील पनवेल हे पहिलेच स्थानक ठरणार आहे. फलाट क्र मांक ६ ते ७ च्या मध्ये हा सरकता जिना असणार आहे.
पनवेल रेल्वेस्थानक हे भविष्यात सर्वात मोठे स्थानक म्हणून उदयास येणार आहे. या ठिकाणी सीएसएमटीसह दिल्ली, राजस्थान, अमृतसर, गुजरात, मंगळुरू, गोवा, त्रिवेंद्रम, चंदिगड आदीसह देशातील विविध भागांतून रेल्वे गाड्या जातात. यामध्ये राजधानी, शताब्दी, तेजस, मंगला, कोकणकन्या, संपर्कक्र ांती या लांबपल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. दिवसाला या ठिकाणाहून ६० ते ७० हजार प्रवासी प्रवास करतात. भविष्यात ही संख्या एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
भविष्यात या स्थानकाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेने येथे सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या सरकत्या जिन्याच्या कामाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पनवेल रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर एस. एम. नायर यांनी दिली.विशेष म्हणजे, नवी मुंबईत असलेल्या रेल्वेस्थानकांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा सरकता जिना पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये बसविला जाणार आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक तसेच शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या जिन्याचा सर्वात जास्त लाभ होणार आहे.
पुढील महिनाभरात सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे मत तुकाराम काळे यांनी व्यक्त केले.