पनवेल : पनवेल तालुक्यातील वावंजे ग्रामपंचायतीवर शेकापचा लाल बावटा फडकला असून गेल्या अनेक वर्षांपासून शेकापची सत्ता असलेली शिरवली ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आहे. वावंजे ग्रामपंचायतीत शेकापचे सरपंचपदाचे डी. बी. म्हात्रे तसेच सदस्यपदाचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. शिरवली ग्रामपंचायतीत भाजपाच्या सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे तर सदस्यपदाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत.
वावंजे ग्रामपंचायतीमध्ये डी. बी. म्हात्रे हे थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रकाश खैरे, कृष्णा पवार, जब्बर शेख, दशरथ पाटील यांचा पराभव करून निवडून आले आहेत. तर शिरवली ग्रामपंचायतीत रखमाबाई बोंडे या अनिता पाटील यांचा पराभव करून सरपंचपदी निवडून आल्या आहेत. वावंजे आणि शिरवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली तर या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. वावंजे ग्रामपंचायतीत शेकापचे सरपंचपदाचे डी. बी. म्हात्रे विजयी झाले असून पूनम धोंगडे, जिनेश पाटील, चंदना पाटील, कांचन पाटील, देवचंद पाटील, आनंदीबाई कातकरी हे उमेदवार निवडून आले आहेत. तसेच लोकशाही आघाडीचे नासीर शेख, कविता पाटील, तोसिफ शेख, अरुण कातकरी हे चार उमेदवार निवडून आले आहेत.
वावंजे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या प्रमिला चोरमेकर या निवडून आल्या आहेत. शिरवलीमध्ये भाजपाचे सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे विजयी झाल्या असून परशुराम रिकामे, भाऊदास सिनारे व नंदा पाटील बिनविरोध तर लीलाबाई चोरघे, अशोक पाटील, इंदुबाई आवाटी, पदुबाई निरगुडा, गिरीजाबाई रंधवी विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये जनार्दन भगत, बाळू वारा, राघो निरगुडा हे शेकापचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.