सुधागडात लसीकरणासाठी नागरिकांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:20 PM2021-04-29T23:20:57+5:302021-04-29T23:21:05+5:30
रात्री १२पासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी तरीही हाती निराशा; नागरिकांमध्ये संताप
विनोद भोईर
पाली : सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण केले जाते. पहिल्या आलेल्या ८० लोकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी १२ वाजल्यापासून लोक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. मात्र, तरीही अनेकांना टोकन न मिळाल्याने त्यांना पुन्हा यावे लागत आहे. या प्रक्रियेत नियोजन व इतर बाबींसंदर्भात त्रुटी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पालीतील शाम खंडागळे यांनी सांगितले की, पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ वाजता टोकन देण्यात येतात. पहाटे ५ वाजता टोकन घेण्यास गेलो असता ३ वाजताच ८० लोकांची नावे घेऊन कोटा पूर्ण केला गेलेला होता. हा अनागोंदी कारभार बंद झाला पाहिजे, असे देखील शाम खंडागळे म्हणाले. ओळखीच्या माणसांना आधीच कुपनाचे वाटप केले जाते. मग लवकर येऊन रांगेत उभे राहिलेल्यांचा काय फायदा? याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले, तर ऋषी झा म्हणाले की, खेडेगावातून येणाऱ्या लोकांची प्रामुख्याने वृद्धांची खूप गैरसोय होते.
मी आईला घेऊन २ ते ३ वेळा फेऱ्या मारल्या. मात्र, कुपन मिळाले नाही तर एकदा व्हॅक्सिन संपले होते. त्यामुळे अजूनही लस घेता आली नाही. अशा प्रकारचे अनुभव अनेक नागरिकांचे आहेत. टोकन घेण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. टोकनसाठी गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. आलेल्या सर्व लोकांना टोकन देऊन त्यांना लसीकरणाच्या तारखा दिल्या पाहिजेत. याबरोबरच एक लसीकरण झालेल्यांना पुन्हा टोकन घेण्यासाठी उभे राहण्यापेक्षा त्यांना ठरावीक तारखा द्याव्यात. लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे, असे सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी सांगितले.