नवी मुंबई : कांदळवण संरक्षण व संवर्धनासाठी यापुढे वर्षातून दोन वेळा उपग्रहाद्वारे नकाशे तयार केले जाणार आहेत. कांदळवण परिसरात सीसीटीव्ही बसविणे, वाहनांना बंदी करणे व संरक्षण व्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा निर्णय कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन केले होते. कांदळवण संवर्धन व संरक्षणासाठी सर्व संबंधीत शासकीय संस्थांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तक्रारींचे तत्काळ निवारण करावे अशा सूचनाही महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कांदळवन क्षेत्र वनविभगास तत्काळ हस्तांतर करणे. नोडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीविषयी चर्चा करणे. डेब्रीज हटविण्यात यावे अशा सूचनाही करण्यात आल्या.
ज्या ठिकाणी कांदळवन क्षेत्राची हानी झाली आहे त्या ठिकाणी पुन्:स्थापना करण्यात यावी. तक्रार निवारणासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह स्वतंत्र सॅक्रेट्रीयेट तयार करणे. कांदळवन परिसरात पोलीस, वनरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या रक्षकांच्या माध्यमातून गस्त घालण्यात यावी. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. अतीसंवेदनशील परिसरात वाहनांना बंदी घालण्याची सूचनहाी करण्यात आली. वनपरिसराचा प्रत्येक सहा महिन्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून नकाशा तयार करावा. ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली असेल त्याचा आढावा घेवून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.
या बैठकीला अप्पर प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामराव ऑनलाईन उपस्थित होते. उप वनसंरक्षक अनिता पाटील,पोलीस उपअधिक्षक संजय सावंत, सहायक पोलीस आयुक्त जितेंद्र जावळे, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशीक अधिकारी रूपाली सोनकांबळे व इतर अधिकारी उपस्थित होते.