उरण : उरणच्या सागरीकिनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या ३० फुटी लांबीच्या व्हेल माशाचा सांगाडा आणि मांस अलग करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. मांसापासून अलग करण्यात आलेल्या सांगाड्याचे जतन करण्यासाठी, सोमवार, १८ जून रोजी ऐरोली सेंटरमध्ये हलविण्यात येण्याची माहिती उरण वनविभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी दिली.उरणच्या केगाव-माणकेश्वर समुद्रकिनाºयावर ३० फुटी लांबीचा व्हेल मासा मृतावस्थेत वाहून आला होता. महाकाय माशाचा सांगाडा अभ्यासासाठी आणि सागरी जीवसृष्टी पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि जतन करण्याची तयारी वनविभागाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्हेल माशाचा सांगाडा मांसापासून अलग करण्याचे अवघड काम मागील तीन दिवसांपासून सुरू होते.सांगाडा सुरक्षितपणे अलग करण्याचे काम अलिबाग येथील प्राणिप्रेमी आणि एनजीओचे मंदार गडकरी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. सांगाडा दुर्गंधीयुक्त मांसापासून अलग करण्यासाठी १५-१६ कामगार मागील दोन तीन दिवसांपासून पाऊस-वाºयाची तमा न बाळगता करीत होते. अखेर रविवारी सांगाडा मांसापासून अलग करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.दुर्गंधीयुक्त मांस त्याच परिसरातील ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन पुरून टाकण्यात आल्याची माहिती उरण वनविभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी दिली. त्यानंतर दुर्मीळ महाकाय सांगाडा ऐरोली सेंटरमध्ये हलविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सोमवार, (१८) संध्याकाळपर्यंत व्हेल माशाचा दुर्मीळ सांगाडा सुरक्षितपणे वनविभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेंटरमध्ये नेण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
व्हेल माशाचा सांगाडा जतन करण्यासाठी ऐरोली सेंटरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:09 AM