बचतगटांच्या उलाढालीवरही लक्ष राहणार, भरारी पथके सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:35 AM2019-03-31T01:35:06+5:302019-03-31T01:35:20+5:30
शहरात ५९१५ गट कार्यरत : नवी मुंबईसह पनवेल परिसरामध्ये भरारी पथके सक्रिय
नामदेव मोरे
नवी मुंबई : निवडणुकांदरम्यान मतदारांना विविध मार्गांनी प्रलोभने दाखविण्यात येतात. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बचतगटांच्या बँक खात्यांवर पैसे जमा केल्याचीही चर्चा आहे. यामुळे प्रशासनाने बचतगटांच्या व्यवहारांवरही लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, भरारी पथकेही सक्रिय केली आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून मतदारांना आमिष दाखविले जाण्याची शक्यता आहे. अनेक वेळा मतदारांना रोख पैसे दिले जातात. पैसेवाटप करणे धोक्याचे ठरत असल्यामुळे किमती वस्तूही भेट म्हणून दिल्या जातात. दारू, मटणाच्या मेजवान्याही दिल्या जातात. बहुतांश प्रलोभने ही पुरुषांनाच दिली जातात. महिला मतदारांची संख्या वाढत असूनही त्यांना थेट लाभ दिले जात नव्हते. यामुळे मागील काही निवडणुकांमध्ये बचतगटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत मदत पोहोचविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची चर्चा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना विभागामध्ये तब्बल ५९१५ गटांची नोंद आहे. तब्बल सव्वालाख महिला या चळवळीमध्ये सक्रिय आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यांच्या विभागामध्ये बचतगटांची निर्मिती केली आहे. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असला तरी निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार याकडे प्रलोभन दाखविण्याची संधी म्हणूनही पाहत आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्येही अशाप्रकारे प्रलोभन दाखविले जाण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनीही बचतगटांसह, जनधन खात्यांवर अचानक जमा झालेल्या पैशांवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यामध्येही अशाप्रकारे यंत्रणा सक्रिय केली जात आहे. भरारी पथकांना त्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीमध्ये अनपेक्षितपणे जमा होणाºया पैशांची चौकशी केली जाणार आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनाही एखाद्या खात्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त किंवा खूप कमी व्यवहार होत असल्यास त्याची माहिती खर्च विषयक समितीला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवी मुंबईमध्येही अशाचप्रकारे चुकीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. निवडणूक विभागाने पोलिसांच्या भरारी पथकांनाही याविषयी सूचना दिल्या आहेत. बचतगटासह इतरही कोणत्या प्रकारे पैशांची देवाण-घेवाण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. शहरातील अनेक बचतगट वर्षभर सक्रिय असतात. त्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत केली जाते. अनेक महिलांनी गृह-उद्योगही सुरू केले आहेत; पण काही गट मात्र राजकीय उद्देशानेच तयार केल्याची चर्चा असून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे. या व्यतिरिक्त नाकाबंदी सुरू केली असून वाहनांची तपासणीही केली जात आहे.
रायगडमध्येही यंत्रणा सज्ज
रायगड जिल्हा प्रशासनानेही निवडणुका निर्भय व चांगल्या वातावरणामध्ये व्हाव्या, यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यामध्ये बँक खाती, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, फर्निचर, भांडी व इतर दुकानांवरही लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. महिला बचतगटांची बँक खाती, जनधन खाती यामध्ये संशयास्पदरीत्या अचानक रकमा टाकलेल्या आढळल्या, तर त्यावरही कारवाई केली जाणार आहे.
विभाग संख्या
बेलापूर ५६१
नेरुळ १३२५
वाशी ५०७
तुर्भे ७०४
कोपरखैरणे ९७२
घणसोली ६१८
ऐरोली ८२१
दिघा ४०७