सिकंदर अनवारे , दासगावगतवर्षी आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सामाईक सांडपाणी केंद्र प्रदूषण मंडळाने ठरवून दिलेल्या मापदंडाप्रमाणे खाडीत पाणी सोडत असल्याचा कांगावा सामाईक सांडपाणी केंद्र आणि महाड औद्योगिक वसाहत करीत आहे. गेल्या आठवडाभर सावित्री खाडी आणि गांधारी नदीमध्ये फेसाळते पाणी वाहत असल्याने केवळ दिखाव्यापुरता आयएसओ प्रमाणपत्र दाखवून औद्योगिक वसाहत प्रदूषणाचे उपद्व्याप करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या पाण्यामुळे शेती आणि मासेमारी व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे घातक, रसायनयुक्त सांडपाणी सावित्री खाडीच्या पात्रात ओवळे गावाच्या हद्दीत सोडले जाते. स्थानिकांकडून होणाऱ्या प्रदूषणाची ओरड वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाढणारा दबाव आणि शासनामार्फत अवलंबण्यात आलेले पर्यावरणाबाबत कठोर धोरण यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत महाड औद्योगिक वसाहतीतील सामाईक सांडपाणी केंद्रात आमूलाग्र बदल करण्यात आले. यामध्ये साठवण टाकीची क्षमता वाढवणे, यंत्रणा अद्ययावत करणे, साफसफाई अशी कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. एवढा प्रचंड पैसा खर्च केल्यानंतर महाड उत्पादन संघाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या सामाईक सांडपाणी केंद्राने गतवर्षी आयएसओ प्रमाणपत्रासाठी प्रयत्न सुरू केले. आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळवलेही. हे प्रमाणपत्र घेणारे पहिले सामाईक सांडपाणी केंद्र म्हणून महाड औद्योगिक वसाहतीच्या या सामाईक सांडपाणी केंद्राचे सर्वत्र कौतुक झाले. नदीतील पाण्याचा रंग, वास निघून गेला होता. नागरिकांचा त्रासही कमी झाला होता. नदीमध्ये माशांचे प्रमाणही वाढले होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून महाड शहरालगत वाहणारे गांधारी आणि सावित्री खाडीचे पात्र फेसाळलेले दिसू लागले आहे.महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे घातक रसायनमिश्रीत सांडपाणी तालुक्यातील ओवळे गावानजीक खाडीपट्ट्यात सोडले जाते. या ठिकाणी फेसाचे तवंग आढळून येतात. तर अशाच प्रकारचे तवंग सावित्री नदी आणि गांधारी नदी पात्रामध्ये जवळपास १५ ते १६ कि.मी. अंतरातही आढळून येत आहेत. नदीतील हे फेसाळणारे पाणी प्रदूषणाचे पितळ उघडे करीत आहे. खाडीचे पाणी मुळातच खारे आहे. हे पाणी भरतीसोबत गांधारी नदीच्या पात्रात मिसळून गांधारी नदीचे पाणीही अधिक दूषित करत आहे. या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नसला तरी गांधारी नदीपात्रात बंधारा घालून पाणी अडवले जाते. डोंगर भागातून तसेच कोतुर्डे धरणातून येणाऱ्या सुरक्षित केलेल्या गोड्या पाण्याचा दासगांव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, मोहप्रे तसेच महाड शहर यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यावर्षी दरवर्षी टाकण्यात येणारा गांधारी नदीवरील बंधारा चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आल्याने खाडीतील खारे पाणी तसेच फेसाळलेले प्रदूषित पाणी या पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या जॅकवेलच्या शेजारीपर्यंत पोहोचले आहे. या फेसाळलेल्या पाण्याची जबाबदारी अजूनही औद्योगिक वसाहतीतील कोणत्याही यंत्रणेने घेतली नसली तरी पाण्यावर दिसणारा हा फेस ओवळे गावच्या ठिकाणी सोडण्यात येणाऱ्या घातक रसायनयुक्त सांडपाण्याच्या ठिकाणाहूनच सुरू होतो. यामुळे औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्याकडेच बोट दाखवले जात आहे. यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दूषित पाण्यामुळे शेती आणि मासेमारीवर धोक्याचे सावित्री खाडी आणि नदी किनाऱ्याच्या शेतीत हे प्रदूषित पाणी नेहमीच शिरून मोठ्या प्रमाणात शेत जमीन आणि पिकांचे नुकसान होत आले आहे. मात्र, नुकसानाची भरपाई काही प्रमाणात औद्योगिक वसाहत मार्फत अदा करण्यात आली आहे. गेले सहा ते सात महिने सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक पाण्यावर फे स दिसू लागल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या मनात घबराहट निर्माण झाली आहे. खाडीतील हे फेसाळ प्रदूषित पाणी भरतीच्या पाण्यासोबत शेत जमिनीमध्ये घुसून धोका निर्माण होण्याच्या भीतीने पुन्हा खाडी पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्यानंतर खाडीत मासेमारी केली जाते. मात्र, फेसाळलेल्या पाण्यामुुळे ही मासेमारी बंद झाली आहे.सध्या सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक वसाहतीमधून ओवळे या गावाजवळ सोडण्यात येणाऱ्या घातक रसायनयुक्त पाण्याला मोठ्या प्रमाणात फेस असून दुर्गंधी आहे. हा फेस सर्व खाडीमध्ये पसरला आहे. पाणी सोडण्याला सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रच (सीईटीपी) जबाबदार आहे. ते कोणत्या तऱ्हेची जबाबदारी न घेता हात वर करतात. मी या सावित्री खाडी प्रदूषणासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे. सध्या फेसाळलेल्या पाण्यामुळे शेती आणि मच्छीमारीला मोठे नुकसान होणार असल्याची माहिती समाजसेवक निजामुद्दीन जलाल यांनी दिली.
सावित्री खाडी, गांधारी नदी फेसाळली
By admin | Published: February 10, 2017 4:31 AM