सिडकोच्या भूखंडांना सव्वादोन लाखांचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:49 PM2019-07-18T23:49:24+5:302019-07-18T23:49:26+5:30
सिडकोच्या घणसोली येथील भूखंडांनी पुन्हा टेकऑफ घेतले आहे.
नवी मुंबई : सिडकोच्या घणसोली येथील भूखंडांनी पुन्हा टेकऑफ घेतले आहे. रो-हाउसेससाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला प्रतिचौरस मीटर तब्बल सव्वादोन लाखांचा दर मिळाला आहे, त्यामुळे मंदीचे सावट असतानाही सिडकोच्या मालमत्तांना मागणी कायम असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
घणसोली सेक्टर ४ येथे रो-हाउसेससाठी आरक्षित असलेल्या २५ भूखंडांसाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या. ४० ते ६० चौरस मीटरच्या या भूखंडांसाठी तब्बल ७७६ निविदा प्राप्त झाल्या होत्या. १५ जुलै रोजी या निविदा उघडण्यात आल्या. भूखंडाच्या लोकेशननुसार पायाभूत किंमत ३०१८३ आणि ३५००० रुपये प्रतिचौरस मीटर इतकी निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र प्रतिचौरस मीटरला दोन लाख २५ हजार रुपयांचा दर मिळाल्याचे सिडकोच्या संबंधित विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, प्राप्त झालेल्या निविदांपैकी चार निविदाधारकांनी भूखंडाची एकत्रित रक्कम टाकल्याने या निविदांवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.