नवी मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडिया लुटण्यासाठी आलेल्या टोळीने सायरनच्या आवाजामुळे पळ काढल्याचा प्रकार एपीएमसी दाणाबंदरमध्ये रविवारी पहाटे घडला. ही टोळी पाच ठिकाणच्या ग्रीलचे लॉक तोडून बँकेच्या आतमध्ये पोहोचली होती; परंतु रोकड असलेल्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच सायरन वाजल्याने त्यांना तिथून पळ काढावा लागला.एपीएमसी दाणाबंदर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत रविवारी पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रविवारची सुट्टी असल्याने मार्केट व बँक बंद असल्याची संधी साधण्याचा प्रयत्न अज्ञात टोळीने केला. सदर बँक दाणाबंदरच्या यू गल्लीच्या पहिल्या मजल्यावर असून गल्लीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर ग्रीलचे दरवाजे आहेत. त्यापैकी मुख्य मार्गाच्या दिशेच्या ग्रीलचे लॉक तोडून ही टोळी यू गल्लीत पोहोचली.त्यानंतर पहिल्या मजल्यापर्यंतचे तीन ग्रीलचे लॉक ब बँकेचे मुख्य शटर तोडून ही टोळी बँकेत पोहोचली. त्यानंतर रोकड लुटण्याच्या प्रयत्नात त्यांनी बँकेतील लॉकर रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरवाजाला सुरक्षा असल्याने त्याचा सायरन वाजण्यास सुरुवात झाली. मोठमोठ्या आवाजात हा सायरन वाजू लागल्याने पकडले जाऊ या भीतीने त्यांना पळ काढावा लागल्याने थोडक्यात बँक लुटीची घटना टळली. बँकेच्या सायरनचा आवाज होताच परिसरात रात्रगस्तीवर असलेल्या एपीएमसीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली; परंतु अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांची टोळी त्या ठिकाणावरून पळून गेली. तर बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे बँकेच्या मॅनेजरला कळताच त्यांनी एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, पाच ग्रील व एक शटर वाकवून टोळी बँकेत घुसल्याचे निदर्शनास आले.या टोळीत नेमक्या किती जणांचा समावेश होता याचा उलगडा झालेला नाही; परंतु बँकेत प्रवेश केलेल्या दोघा-तिघांनी तोंडावर रुमाल बांधल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. बँकेच्या तळमजल्यावरील एका व्यापाºयानेही गाळ्याबाहेर दोन सीसीटीव्ही बसवलेले आहेत. त्याच मार्गाने गुन्हेगारांनी बँकेत प्रवेश केल्याने या सीसीटीव्हीमधून त्यांची ओळख पटण्याची शक्यता आहे.दाणाबंदरमधील अंतर्गतच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकांची गस्त असते. याची माहिती घेऊनच चोरट्यांनी यू गल्लीच्या मुख्य प्रवेशद्वाराऐवजी वापरात नसलेल्या मागच्या प्रवेशद्वाराचे ग्रील तोडून आत प्रवेश केला असावा.मार्केटच्या मागच्या बाजूच्या मुख्य मार्गाच्या पदपथाच्या उंचीपुढे एपीएमसीची सुरक्षा भिंत ठेंगणी असल्याने त्यावरील तारा तोडून टोळी आत घुसल्याचाही अंदाज आहे. त्यानुसार बँक लुटीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात टोळीविरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
सायरनमुळे टळली एसबीआय बँकेची लूट, एपीएमसीमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:16 AM