खोदकामांचा धडाका

By admin | Published: April 26, 2017 12:35 AM2017-04-26T00:35:24+5:302017-04-26T00:35:24+5:30

शहरात एकाच वेळी रस्त्यांच्या खोदकामांचा धडाका सुरू झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात रस्ते खोदण्याचे काम हाती

Scaffolding | खोदकामांचा धडाका

खोदकामांचा धडाका

Next

नवी मुंबई : शहरात एकाच वेळी रस्त्यांच्या खोदकामांचा धडाका सुरू झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात रस्ते खोदण्याचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे, तर पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेने गेल्या आठवड्यांपासून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. ही कामे शहरात एकाच वेळी सुरू आहेत. नाल्यातील गाळ काढून तो पदपथावर गोळा केला जात आहे. त्यामुळे पदपथांवरून चालताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यातच महावितरण, महानगर गॅस आणि रिलायन्स या कंपन्यांनी आपल्या केबल्स टाकण्यासाठी रस्त्यांच्या खोदकामांचा धडाका लावला आहे. ही कामे सुध्दा संपूर्ण शहरात एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. काही ठिकाणी पोकलेन लावून रस्ते खोदले जात आहेत, तर काही भागात यंत्राच्या साहाय्याने रस्त्यावर चिरा पाडण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे ही कामे करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. त्याचा फटका शहरातील अंतर्गत वाहतुकीला बसला आहे. टप्प्याटप्प्यावर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाशी सेक्टर ९ येथील शबरी हॉटेलच्या समोर तीन दिवसांपासून रस्ता खोदून ठेवला आहे. केबल्स टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु रस्त्याच्या कडेला लांबच्या लांब डेब्रिज टाकून ठेवल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. कोपरखैरणेत रिलायन्स कंपनीने पुन्हा केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे. नेरूळ, सीबीडी, बेलापूर, ऐरोली आदी भागात एकाच वेळी ही कामे सुरू झाल्याने दळणवळण यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
शाळा आणि महाविद्यालयाला सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या बच्चे कंपनी व ज्येष्ठ नागरिकांची सर्वत्र लगबग पाहायला मिळते. मात्र खोदलेले रस्ते आणि नाल्यातून उपसलेला गाळ यामुळे सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Scaffolding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.