शहरातील उद्यान देखभालीच्या कामांमध्ये घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:43 AM2020-09-27T00:43:16+5:302020-09-27T00:43:28+5:30

२८० उद्यानांसाठी दोनच ठेकेदार । वर्षाला ३४ कोटी रुपये होणार खर्च; ठेकेदारांकडून कामाची घाई

Scam in city garden maintenance works? | शहरातील उद्यान देखभालीच्या कामांमध्ये घोटाळा?

शहरातील उद्यान देखभालीच्या कामांमध्ये घोटाळा?

Next

नामदेव मोरे।

नवी मुंबई : शहरातील २८० उद्यान, दुभाजक, ट्री बेल्ट,चौक व मोकळ्या जागेतील हिरवळीच्या देखभालीसाठी मनपाने फक्त दोनच ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. यासाठी वर्षाला जवळपास ३४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. पाच महिने देखभाल न करता खर्च दाखविण्यात आला असून, कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही देण्यात आलेली नाही. देखभालीअभावी उद्यानांची दुरवस्था झाली असून, आरोपांच्या फैरी झडू लागल्यानंतर ठेकेदाराकडून कामाची घाई सुरू झाल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये उद्याने तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय दुभाजकांच्या मध्ये, रोडच्या दोन्ही बाजूला व मोकळ्या भूखंडावरही हिरवळ विकसित केली जात आहे. अनेक ठिकाणी ट्री बेल्ट तयार केले आहेत. या सर्वांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली जात होती. प्रकल्पग्रस्त ठेकेदार मनपाच्या स्थापनेपासून हे काम करत आहेत. एकाच ठेकेदाराची मक्तेदारी नसल्यामुळे कमी पैशामध्ये चांगले काम केले जात होते.
उद्यानामधील विद्युत व स्थापत्यविषयक काम अभियांत्रिकी विभागाकडून केले जात होते. यामुळे देखभालीचे काम व्यवस्थित होत होते व जे योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाईही करता येत होती, परंतु महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करून प्रत्येक परिमंडळसाठी एक असे शहरातील सर्व उद्यानांसाठी फक्त दोनच ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. मेपासून नवीन ठेकेदारावर देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उद्यानातील माळी काम, विद्युत, सुरक्षा, स्थापत्य सर्व कामे एकच ठेकेदार करणार आहे. परिमंडळ एकसाठी जवळपास २५ कोटी व परिमंडळ दोनसाठी वर्षाला जवळपास ९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. कोरोनामुळे मार्चपासून सर्व उद्याने बंद होती. या काळातही ठेकेदाराने उद्यानाची देखभाल करणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात देखभालीची कामे झाली नाहीत. अनेक उद्यानांमधून पावसाळी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे चिखल तयार झाला आहे. काही ठिकाणी संरक्षण भिंती कोसळल्या आहेत. खेळण्यांची दुरवस्था झाली आहे.
उद्यानांमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांनी बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. गवत कापलेले नाही. सुशोभीकरणांसाठी लावलेल्या झाडांची छाटणी करण्यात आलेली नाही. आमदार मंदा म्हात्रे यांनी या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर यंत्रणा जागी झाली आहे.
ठेकेदाराने उद्यानांमधील गवत कापण्यास व मोडलेली खेळणी बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिका आयुक्तांनीही या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने कामाचा वेग वाढविला आहे.

आमदारांच्या तक्रारीनंतर धावपळ सुरू
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उद्यानाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. या कामाची व दिलेल्या बिलांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर ठेकेदाराने सर्व उद्यानांमध्ये कामे करण्याची घाई सुरू केली आहे. मनपाचे पथकही उद्यानांमध्ये जाऊन कामांची पाहणी करू लागली आहे. पाच महिने वाढलेले गवत काढण्यास व इतर कामे करण्यास सुरुवात केली आहे. चार महिने देखभालीकडे दुर्लक्ष करणाºया यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.


कर्मचारी संघटनेचीही तक्रार
उद्यान देखभालीच्या ठेकेदाराने कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम दिली नसल्याची तक्रार समाज समता कामगार संघाने मनपा आयुक्तांकडे केली आहे. संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी याविषयी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. उद्यान विभागात नियमापेक्षा कमी कर्मचाºयांमध्ये काम करून घेतले जात आहे. याविषयी सविस्तर तपशील मिळविण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागीतली आहे, परंतु प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

खतनिर्मितीही बंद
स्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेने प्रत्येक उद्यानामध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली होती. उद्यानातील कचºयातून खतनिर्मिती करून त्याचा वापर उद्यानांसाठी केला जात होता. सद्यस्थितीमध्ये खतनिर्मिती बंद झाली असून, यासाठी तयार केलेल्या बिन्सचीही दुरवस्था झाली आहे.

बोर्डाचे सुरक्षारक्षक हटविले
यापूर्वी मनपाच्या उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक बोर्डाच्या गार्डची नियुक्ती केली होती, परंतु नवीन ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड हटविण्यात आले आहेत. खासगी कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमले आहेत. अनेक सुरक्षारक्षक गणवेशात नसतात, त्यांच्याकडे ओळखपत्रही नसते. नेरुळमधील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये पूर्वी सुरक्षारक्षक सायकलवरून ट्रॅकवर फेºया मारायचे. नवीन सुरक्षारक्षक एकाच ठिकाणी बसून असतात.

विभागनिहाय उद्यान, ट्री बेल्ट, दुभाजक, चौक व मोकळ्या जागांचा तपशील

विभाग संख्या क्षेत्रफळ (चौ.मी.)
बेलापूर ६४ २९८६८७
नेरुळ ५३ २६६१३१
वाशी ४८ १९२७४६
तुर्भे सानपाडा २५ १००९६०
कोपरखैरणे ३१ ८९१७४
घणसोली १२ २८११५
ऐरोली ४४ १३८२२०
दिघा १ ५१००

तळीरामांचे अड्डे
शहरातील अनेक उद्यानांमध्ये रात्री मद्यपी व अमली पदार्थ ओढणाºयांची गर्दी असते. दारूच्या बाटल्या सर्वत्र पाहावयास मिळतात. नेरुळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे व इतर ठिकाणीही उद्यानामध्ये मद्यपान सुरू असते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ठेकेदाराकडून सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

Web Title: Scam in city garden maintenance works?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.