पनवेल : ज्याच्या पाऊलखुणा सापडत नाहीत तो काळा पैसा याचा मागोवा घेता येतो. देशाला पोखरणारे व्यवहार रोखीत चालतात. सनदी लेखापाल आपल्या पक्षकारावरील निष्ठेपायी कायद्यातील पळवाटा शोधून सरकारवर दरोडा घालतात, असे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी ‘कफ’च्या १७ व्या वर्धापनदिनी बोलताना संगितले.सिटीझन्स युनिटी फोरम (कफ) या संस्थेचा वर्धापन दिन फडके नाट्यगृहात साजरा करण्यात आला. दीपक करंजीकर यांनी बँक खात्यामुळे खातेदाराची ओळख निर्माण होते. त्याच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तयार होतात, त्याची पत तयार होते व आर्थिक शिस्त निर्माण होते. मात्र भारतातील बहुसंख्य जनता या नोंदीविनाच संपून जातात. यासाठीच जनधन योजनेमार्फत खाती निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे पायाभूत सुविधांसाठी पैसा कमी उपलब्ध होतो. काळ्या पैशाचा राक्षस तयार होतो. भारताची समाज व्यवस्था श्रीमंत, मध्यम व गरीब अशी आहे. ७० टक्के जनता गरीब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अर्थक्र ांती संस्थेच्या वतीने पंतप्रधानांकडे सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे १००० व ५०० च्या नोटा रद्द करण्यात आल्या असून कर व्यवस्थेच्या बदलावर विचार सुरू आहे.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मदन मराठे, शैक्षणिक महेंद्र नाईक, क्रीडा क्षेत्र प्रिसिलिया मदन, शासकीय सेवा बबन म्हात्रे, कला क्षेत्र अनुपमा तकामोगे व युसुफ मेहरअली सेंटर यांना दीपक करंजीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘मी अनिकेत सहस्त्रबुध्दे’ या नाटकातील कलाकार व तंत्रज्ञांचा गौरव केला. ‘कफ’चे अध्यक्ष अरु ण भिसे यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन मनोहर लिमये व आभार संदीप शिंदे यांनी मानले.
कायद्यातील पळवाटा शोधून सरकारवर दरोडा
By admin | Published: December 24, 2016 3:24 AM