पनवेलमधील स्कॅनिंग मशीन बंद
By admin | Published: October 4, 2016 02:46 AM2016-10-04T02:46:45+5:302016-10-04T02:46:45+5:30
काही दिवसांपूर्वी उरणमध्ये अतिरेकी दिसल्याच्या संशयावरून परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला. उरणसह पनवेल शहरासह येथील रेल्वे स्थानकातील सुरक्षा
पनवेल : काही दिवसांपूर्वी उरणमध्ये अतिरेकी दिसल्याच्या संशयावरून परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला. उरणसह पनवेल शहरासह येथील रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. हार्बर मार्गावरील अंतिम स्थानक, कोकणात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा थांबा असल्याने स्थानकात दररोज लाखो हजारो प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी याठिकाणी स्कॅनिंग मशीन बसविण्यात आले आहे. मात्र महिन्याभरापासून मशीन बंद आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पनवेल रेल्वे स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. कोकणातील विस्तीर्ण किनारपट्टीवरून पनवेल मार्गे अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किनारपट्टीवर शस्त्र किंवा दारूगोळा उतरण्याची शक्यता गुप्तहेर संघटनांकडूनही अनेकदा वर्तवण्यात आली आहे. याचा अनुभव १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी आला आहे. या स्थानकात लोकल्सबरोबरच कोकण व दक्षिण भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबतात. येथून जवळच जेएनपीटी बंदर, ओएनजीसी प्रकल्पाबरोबरच अनेक रासायनिक प्रकल्प आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकात चोख बंदोबस्त, तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र महिन्याभरापासून स्थानकातील स्कॅनिंग मशीन बंद असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.