पनवेलमध्ये केशरी रेशनकार्डचा तुटवडा

By admin | Published: January 30, 2017 02:15 AM2017-01-30T02:15:45+5:302017-01-30T02:15:45+5:30

पनवेल तालुका पुरवठा विभागाकडे रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत कार्ड उपलब्ध नसल्याचे कारण यंत्रणेकडून दिले जात आहे.

The scarcity of the Kesari ration card in Panvel | पनवेलमध्ये केशरी रेशनकार्डचा तुटवडा

पनवेलमध्ये केशरी रेशनकार्डचा तुटवडा

Next

अरूणकुमार मेहत्रे , कळंबोली
पनवेल तालुका पुरवठा विभागाकडे रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत कार्ड उपलब्ध नसल्याचे कारण यंत्रणेकडून दिले जात आहे. असे असले तरी एजंटकडून आलेल्या अर्जाला प्राधान्य दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत उपाययोजना आणि पारदर्शकता कधी येणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पनवेल तालुका विस्ताराने व लोकवस्तीने मोठा असून दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढच होत आहे. शहरीबहुलबरोबरच ग्रामीण भागही मोठा असून अनेक आदिवासी वाडे- पाडे आणि इतर गावांचा यात सहभाग आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांबरोबर अल्प उत्पन्न गटातील लोकसंख्याही परिसरात मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांकडून पनवेल तहसील कार्यालयात रेशन कार्डकरिता अर्ज केला जातो. याशिवाय मूळ गावातून कार्ड रद्द करून येथे शिधापत्रिका मिळावी, यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रहिवासी दाखल्यासाठीही अनेकदा रेशन कार्ड आवश्यक असते.
पनवेल विभागात महिन्याला जवळपास ४०० अर्ज केशरी शिधापत्रिकेसाठी येतात. परंतु वारंवार हेलपाटे घालूनही त्यांना हे कार्ड उपलब्ध होत नाही. कार्ड संपले आहेत, चार दिवसांनी चक्कर मारा, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. परंतु महिनाभर फेऱ्या मारूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शेवटी कंटाळून काही जण एजंटकडून कार्ड बनवून घेत आहेत. शिधावाटप केंद्रात अडवणूक होत असल्याने नाइलाजास्तव दलालांकडे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एजंट आणि शिधावाटप विभागातील लिपिकाचे साटेलोटे असल्याने एजंटव्यतिरिक्त येणाऱ्या अर्जदारांना थाराच दिला जात नसल्याचे समोर येत आहे.
पुरवठा अधिकारी आणि सह्या करण्याचे अधिकार असलेल्या अव्वल कारकून यांना अंधारात ठेवून सगळा गोलमाल केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना केशरी कार्ड काय तर व्यवस्थित उत्तरे सुध्दा मिळत नाही. यासंदर्भात कारकून भरत गुंड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता शासनाकडूनच शिधावाटप कार्ड येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी तसेच शासनाला कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. मग प्रजासत्ताक दिनाच्या आधी काही जणांना कार्ड कसे दिले गेले, असा सवाल केला असता आमच्याकडे काही कार्ड ठेवले आहेत. ते अर्जंट असणाऱ्यांनाच दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
एक महिना अगोदर आम्ही हा विषय हाताळला आहे. सर्वसामान्यांना रेशन कार्ड मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मात्र दलालांमार्फत त्वरित मिळते ही खंत असल्याचे मनसेचे कामोठे शाखा अध्यक्ष अंकुश मोहिते यांनी व्यक्त केली. जलद प्रशासकीय प्रणालीच्या गप्पा एकीकडे मारल्या असताना अशा प्रकारे महिनोन्महिने केशरी कार्ड येत नसल्याबद्दल शिवसेनेचे सचिन गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.

Web Title: The scarcity of the Kesari ration card in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.