नवी मुंबईतील रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:21 AM2019-06-07T01:21:37+5:302019-06-07T06:35:51+5:30
नवी मुंबई महापालिकेकडून ९ कोटी ३४ लाखांचा प्रस्ताव मंजूर : ३८६ प्रकारच्या औषधांसह सर्जिकल साहित्याची होणार खरेदी
नवी मुुंबई : महापालिका रुग्णालयांमधील औषधांसह सर्जिकल साहित्याचा तुटवडा संपणार आहे. ३८६ प्रकारची औषधे व साहित्य खरेदीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यासाठी नऊ कोटी ३४ लाख रुपये खर्च होणार असून, रुग्णांवर चांगले उपचार करणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा काही महिन्यांपासून कोलमडली होती. मनुष्यबळ कमी असल्यामुळे नेरुळ, सीबीडी व ऐरोलीमधील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नाही. तुर्भे व कोपरखैरणेमधील माता बाल रुग्णालय इमारत धोकादायक झाल्यामुळे बंद करावी लागली होती. यामुळे वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयावरील भार वाढला होता. येथे ३०० रुग्णांची क्षमता आहे; पण अनेक वेळा ३५० पेक्षा जास्त रुग्णभरती केले जाते.
बाह्यरुग्ण विभागामधील रुग्णांची संख्याही वाढली होती; पण येथेही डॉक्टरांचा व औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णभरती थांबविण्याची नामुष्की ओढवली होती. एप्रिलमध्ये अतिदक्षता व ट्रामा केअरसह महिला व पुरुष वैद्यकीय कक्षामध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे नवीन रुग्णांना भरती न करता मुंबई महापालिकेत पाठविले जात होते. औषधे व सर्जिकल साहित्य पुरेसे नसल्यामुळे रुग्णांना बाहेरील औषधे खरेदी करावी लागत होती. नागरिक व लोकप्रतिनिधींनीही याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती.
आयुक्त रामास्वामी एन. यांनी आरोग्याच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सहा वैद्यकशास्त्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला व मे अखेरीस तीन तज्ज्ञ प्रत्यक्ष रुजू करून रुग्णालयाचे कामकाज पूर्ववत सुरू केले होते. वैद्यकशास्त्रतज्ज्ञांची नियुक्ती झाल्यानंतर नवीन रुग्णांची भरती करण्यास सुरुवात केली; परंतु औषधांचा तुटवडा असल्यामुळे गरीब रुग्णांची परवड सुरूच होती. प्रशासनाने औषध, सर्जिकल व पॅथॉलॉजी साहित्य खरेदीचे नऊ प्रस्ताव तयार केले होते. यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली होती; परंतु लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाल्यामुळे साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी घेता आली नव्हती. निवडणुका संपल्यानंतर ६ जूनला पहिली स्थायी समितीची बैठक झाली असून, त्यामध्ये सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नऊ कोटी ३४ लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. त्यामध्ये सहा कोटी ९७ लाख रुपयांची औषधखरेदी, एक कोटी ४४ लाख रुपयांचे सर्जिकल साहित्य व ४६ लाख ८० हजार रुपये किमतीचे पॅथॉलॉजी साहित्य खरेदीच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यामुळे ठेकेदारांना कार्यादेश देऊन तत्काळ औषधे व साहित्य खरेदी करणे शक्य होणार असून, पुढील काही दिवसांमध्ये रुग्णालयातील गैरसोय कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तक्रार नोंदवही ठेवण्याची मागणी
महापालिका आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय व नेरूळ, ऐरोली व सीबीडी रुग्णालयेपूर्ण क्षमतेने चालविली जात नाहीत. डॉक्टरांची कमतरता व इतर कारणे सांगून रुग्णांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पाठविले जाते. भरती करून घेतलेल्या रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करण्यास सांगितले जाते. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयातील कामकाजाविषयी अनेक वाईट अनुभव येतात. पण तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न अनेकांना पडत असतो. यामुळे रुग्णालयात तक्रार व अनुभव नोंदवही ठेवण्यात यावी.
यामुळे रुग्णांना नक्की कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. औषधे बाहेरून आणावी लागली का व कोणती औषधे बाहेरून आणावी लागतात यासह सर्व माहिती प्रशासनास उपलब्ध होऊ शकते. या तक्रारी व सूचनांमधून रुग्णालयाचे कामकाज सुधारण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया वाशी येथे राहणारे प्रशांत पवार यांनी व्यक्त केली.
विनाविलंब अंमलबजावणी व्हावी
महापालिकेने औषध व सर्जिकल साहित्य खरेदीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या प्रस्तावांची लवकर अंमलबजावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असावे व औषधांसह इतर साहित्याचा भुर्दंड रुग्णांवर पडू नये अशी प्रतिक्रिया तुर्भे नाका, इंदिरानगर व इतर परिसरातून रुग्णालयात आलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.