नवी मुंबई : मराठी भाषेचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच मराठीचा प्रसार होण्यासाठी सरकारच्या मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र ऐरोली येथे उभारले जाणार आहे. या उपकेंद्राद्वारे भाषा संवर्धनाशी निगडित विविध ठिकाणी विखुरलेली सरकारी कार्यालये एकाच छताखाली आणली जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या या भव्य वास्तूत भाषा संचालनालय, बाल विभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभागाची रचना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या मराठी भाषेशी निगडित असणाऱ्या विभागांची कार्यालये मुंबईत विविध ठिकाणी विखुरलेली आहेत. ही सर्व कार्यालये ऐरोली येथे नव्याने सुरू होणाऱ्या मराठी भाषा भवनात एकाच ठिकाणी येणार असल्यामुळे त्यांच्या कामात समन्वय साधता येईल, या उद्देशाने सरकारने स्वतंत्र भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. या भवनाच्या जागेची पाहणी करण्यासाठी देसाई यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
ऐरोली सेक्टर १३ येथे भूखंड क्र. ६ अ या ठिकाणी मराठी भाषा भवन उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू होणार आहे. या भवनासाठी सिडकोकडून ३०१८ चौ. मीटरचा भूखंड मंजूर झाला आहे. पाच माळ्यांच्या या वास्तूमध्ये एकूण ४२२१ चौ. मीटरचे प्रत्यक्षात बांधकाम होणार आहे. या वास्तूसाठी २७ कोटी रुपये खर्च येणार आहे. या भवनाचे काम एमआयडीसीमार्फत करण्यात येईल. त्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहे.