कर्जत : कोविडच्या पार्श्वभूमीवर १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. माथेरानमध्ये असलेल्या खासगी आणि नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट वाढला आहे.
माथेरान येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर मराठी माध्यमिक विद्यालय आणि सेंट झेव्हियर इंग्लिश माध्यमिक या दोन शाळा सोमवारपासून रेग्युलर सुरू झाल्या आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान सर्व वर्ग सॅनिटाइझ करून विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहे. फक्त ९ वी व १० वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच सातवी, आठवीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी सांगितले. हे वर्ग दररोज १०.४० ते १२.४० या दोन तासांत घेण्यात येतील, असे ही त्यांनी सांगितले.पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे संचालक शशीभूषण गव्हाणकर, नगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रतिभा घावरे, नगरसेवक संदीप कदम, चंद्रकांत जाधव हे उपस्थित होते. शाळेचा सर्व शिक्षक वृंद हजर होता. दहावीला २८ विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत क्रॉस बसण्याची व्यवस्था केली.