पनवेल : कोरोना काळात अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्य्याने सुरु होत आहेत. सोमवारी पालिका क्षेत्रातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.यावेळी शाळा प्रशासन तसेच विद्यार्थी देखील विविध नियमांचे पालन करून शाळेला हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळाले.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २२ जानेवारी रोजी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परिपत्रक काढून २७ जानेवारीपासून ५ वी ते १२ पर्यंत शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. साफसफाई,शिक्षकांच्या कोविड टेस्ट आदींमुळे शाळा सुरू होण्यास विलंब लागला होता; मात्र दोन आठवड्यांचा काळावधी लोटल्यानंतर शाळा सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ८ फेब्रुवारी पनवेल तालुक्यातील बहुतांशी शाळा सुरु झाल्या आहेत. खारघरमधील कोपरा गावातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. यावेळी विद्यार्थी मास्क घातलेले पाहावयास मिळाले. शाळेच्या वतीने देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करीत सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब खारघर व इनरव्हील खारघरच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका एम. गावीत,सुनील निकुंभ, महाले ओ. डी. ,थोरात जे. बी. , मन्सुरी जे. ए., मगरे एस. बी., तोडेकर एस. के.आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पनवेलमधील शाळांची वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 1:52 AM