- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबसची तपासणी करून घेण्याच्या सूचना आरटीओकडून स्कूलबस मालकांना करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी ही तपासणी करून घ्यायची असून तपासणी न करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबित केला जाणार आहे. ज्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट वैध आहे, त्यांनाही ही चाचणी करावी लागणार आहे.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात घडू नयेत, याकरिता त्यांची योग्यता तपासली जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गतवर्षापासून आरटीओकडून स्कूलबसची तपासणी होत आहे. स्कूलबसच्या सतत होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळांकडून नेमलेल्या अथवा खासगी स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नव्हती. शिवाय, चालकांच्या बेशिस्तीमुळेही अपघात घडत होते. अनेकदा नादुरुस्त अवस्थेतील वाहनेही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरली जातात. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गतवर्षी झालेल्या सुनावणीत स्कूलबससाठी तपासणी आवश्यक करण्यात आली आहे. प्रतिवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूलबस मालकांनी आरटीओकडून ही तपासणी करून घ्यायची आहे. यानुसार यंदा १५ जूनपूर्वी सर्व स्कूलबस मालकांनी त्यांच्याकडील वाहनांची तपासणी करून घेण्याचे, आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सूचित केले आहे. स्कूलबसची ही तपासणी नि:शुल्क असणार आहे.