शाळा बंद... आता महापालिका मुख्यालयात भरवणार शाळा, शिक्षकांनी दिला ठिय्या
By नारायण जाधव | Published: June 22, 2023 03:06 PM2023-06-22T15:06:40+5:302023-06-22T15:06:53+5:30
ठोस आश्वासन न मिळाल्याने पालिकेच्या सीबीएसई शाळेचे पालक आक्रमक
नवी मुंबई: दर्जेदार शिक्षणाचा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचा भुरखा गुरुवारी कोपखैरणे येथील पालिकेच्या सीबीएसई शाळेतील पालकांनी उतरवला. गेली दोन वर्षे शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक न दिल्याने पालकांनी शाळेचा प्रवेशद्वारावर मुलांसह पाच तास ठिय्या मारला. पालिकेकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त पालकांनी जो पर्यंत पुरेसे शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळा बंदची घोषणा करून थेट पालिका मुख्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे.
या शाळेत सद्यस्थितीत १,३७५ पटसंख्या असून फक्त दहा शिक्षक आहेत. गेली दोन वर्षे पालक शिक्षकांची मागणी करीत आहेत. पालिका तसेच राजकीय नेत्यांचा कार्यालयाचे उंबरठे झीजवून या वर्षी शाळा सुरू झाली तरी शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे पालकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.
बुधवारी महपालिका आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावले, मात्र भरती प्रक्रिया सुरू आहे. लवकरच शिक्षक मिळतील असे नेहमीचे उत्तर दिले. पालकांनी ठोस लेखी आश्वासन मागितले पण तसे आम्ही देऊ शकत नाही असे सांगितल्याने पालकांनी गुरुवारी मुलांसह शाळेत जात प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले. पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. घोषणा देत सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत ठिय्या मारला. मुलांनीही आम्हाला शिक्षक द्या आशां घोषणा दिल्या.
मुलांसह पालकांना अश्रू अनावर
एकीकडे पलिकेविरोधात संताप व्यक्त करताना मुलांचे झालेले नुकसान सांगताना पालकांना अश्रू अनावर झाले होते. मुलेही शिक्षकांची मागणी करीत असताना रडत होते.
एकही अधिकारी फिरकला नाही
एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी तेथे फिरकला नाही. पालिका शाळेचे एक केंद्र समन्वयक तेथे आले व त्यांनी आपले म्हणणे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतो असे सांगितल्याने पालक आणखी आक्रमक झाले.
पोलिसांची समन्वयाची भूमिका
गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी समन्वय करीत पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण पालकांनी शिक्षक कधी देताय ते लेखी द्या तरच आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा कायम ठेवला.
आत्ता पालिकेत शाळा भरवू शेवटपर्यंत पालिका प्रशासन ठोस आश्वासन देवू न शकल्याने पालकांनी जो पर्यंत शिक्षक शाळेत हजर होत नाहीत, तो पर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय घेत सोमवारी पालिका मुख्यालयात शाळा भरवण्याची घोषणा केली.
ते सहा शिक्षक आलेच नाहीत
पालिका प्रशासनाने आंदोलन मागे घ्यावे यासाठी बुधवारी रात्री पालिकेच्या इतर शाळेतील सहा शिक्षकांची ऑर्डर काढली. तो कागद दाखवत आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. मात्र ते शिक्षक आहेत कुठे असा सवाल पालकांनी केले. मात्र हे शिक्षक आज हजरच झाले नाहीत. यातील एकही शिक्षक या शाळेत दिवसभर फिरकला नाही.
भाजपसह मनसेने दिला पाठिंबा
पालक जमा झाल्यानंतर मनसेचे स्थानिक पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी येत आपला पाठींबा दर्शवला. पालक संतप्त असल्याचे समजल्यानंतर संदीप नाईक यांनी संपर्क करीत येथील स्थानिक माजी नगरसेवक मुनावर पटेल व लीलाधर नाईक यांना तेथे पाठवले. त्यांनी पालकांनी काही दिवस प्रतीक्षा करावी अशी विनंती केली. मात्र पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे मनावर पटेल यांनी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करीत पालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.