बांधकाम मजुरांच्या मुलांची शाळा आता रविवारी देखील भरणार
By admin | Published: April 4, 2016 02:12 AM2016-04-04T02:12:19+5:302016-04-04T02:12:19+5:30
बांधकाम मजुरांच्या कामाच्या वेळा, सतत बदलणारे ठिकाण, उघड्यावरील संसार अशा अनेक समस्यांमुळे त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण मात्र अर्ध्यावरच तुटते तर काहींना मात्र शाळेची पायरी देखील
प्राची सोनवणे, नवी मुंबई
बांधकाम मजुरांच्या कामाच्या वेळा, सतत बदलणारे ठिकाण, उघड्यावरील संसार अशा अनेक समस्यांमुळे त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण मात्र अर्ध्यावरच तुटते तर काहींना मात्र शाळेची पायरी देखील चढायला मिळत नाही. अशा मुलांसाठी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन रविवारी शाळा भरविण्याचा उपक्रम बेलापूरच्या समाजसेविका सुप्रभा रावराणे या राबवित आहेत.
बांधकाम मजुरांच्या मुलांना नृत्य, संगीत, कला,कॅलिग्राफी, चित्रकला, नाटक, हस्तकला, हॉकी,व्हॉलीबॉल अशा विविध कला तसेच क्रीडाविषयाचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. बेलापूर सेक्टर १५ येथे सुरू असलेले इमारतीचे बांधकाम, पामबीच मार्गावर सुरू असलेल्या नवीन प्रकल्पांचे बांधकाम, सानपाडा, नेरुळ, पनवेलमधील जनकल्याण आश्रम तसेच मुंबईतील धोबीघाट अशा अनेक परिसरात ही शाळा भरविली जाणार आहे. समाजसेविका सुप्रभा यांच्या वतीने गेली कित्येक वर्षे नवी मुंबईतील विविध भागात साक्षरतेविषयी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दररोज संध्याकाळी शाळा भरवून शहरातल्या बांधकाम मजुरांच्या मुलांना शिकवणीचे काम रावराणे यांच्यामार्फत केले जात आहे. या मुलांना लागणारे अभ्यासाचे साहित्य इच्छुक स्वयंसेवकांकडून मदत म्हणून दिले जाते. या मुलांबरोबरच त्यांच्या घरातील महिलावर्गालाही स्वयंरोजगाराचे धडे दिले जात असून कागदी पिशव्या तयार करणे, टाकाऊपासून टिकाऊ आदींचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तरुण स्वयंसेवकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले जाते, सण-उत्सव साजरा केला जातो. शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कित्येक वेळा तिथल्या लोकांशी लढावे लागते, त्यांचा सामना करावा लागतो तरी मात्र न डगमगता या मोठ्या जिद्दीने काम सुरू आहे. सुप्रभा सारख्या या आधुनिक सावित्रीचे काम आज शहरात दूरवर पसरले असून अनेक शेकडो मुलांना साक्षर केले आहे.