शाळेवर कारवाईला शिक्षण विभागाची चालढकल, व्हॅलेंटाइन डे सुट्टी प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:48 AM2018-02-20T01:48:29+5:302018-02-20T01:48:34+5:30
महाशिवरात्रीची सुट्टी व्हॅलेंटाइन डेला दिल्याप्रकरणी डी.पी.एस. शाळेवर कारवाई करण्यात शिक्षण विभागाकडून चालढकल होत असल्याचे दिसत आहे.
नवी मुंबई : महाशिवरात्रीची सुट्टी व्हॅलेंटाइन डेला दिल्याप्रकरणी डी.पी.एस. शाळेवर कारवाई करण्यात शिक्षण विभागाकडून चालढकल होत असल्याचे दिसत आहे. कोणाची प्रत्यक्ष तक्रार आली तरच कारवाईचा विचार करणार, अशी भूमिका घेऊन शिक्षण मंडळ अप्रत्यक्षरीत्या शाळा व्यवस्थापनाला पाठीशी घालत आहे. यामुळे घडलेल्या प्रकाराची तक्रार शिक्षणमंत्र्यांकडे करण्याच्या पावित्र्यात शाळेचे शिक्षक आहेत.
नेरुळ येथील दिल्ली पब्लिक स्कूल व्यवस्थापनाने मंगळवारी महाशिवरात्रीच्या दिवशी शाळा सुरू ठेवली होती. मात्र, दुसºया दिवशी व्हॅलेंटाइन डेला मात्र शाळेला सुट्टी दिलेली. याकरिता शाळा व्यवस्थापनाकडून कागदोपत्री असलेली मंगळवारची महाशिवरात्री बुधवारी केली. या प्रकाराने पालक व शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. हिंदू धार्मिक सणांना सुट्टी नाकारणाºया व्यवस्थापनाने व्हॅलेंटाइन डेला कोणत्या आधारावर सुट्टी दिली? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होऊ लागला आहे. कॉन्व्हेंट शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये पाश्चिमात्य संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी असतानाच हा प्रकार समोर आला आहे; परंतु या प्रकारात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न डी.पी.एस. शाळा व्यवस्थापनाकडून झाला आहे. यासंदर्भात पालक व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘लोकमत’ने संपूर्ण प्रकाराला वाचा फोडली आहे. त्यानंतरही शिक्षण विभागाकडून दोषी शाळा व्यवस्थापनावर कारवाईला चालढकल केली जात आहे. प्रत्यक्षात कोणाची तक्रार आली तरच योग्य कारवाईबाबत विचार केला जाईल, असे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांचे म्हणणे आहे; परंतु महाशिवरात्रीऐवजी व्हॅलेंटाइन डेला सुट्टी दिल्याचे उघड असतानाही तक्रारदार हवा कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादा पालक अथवा शिक्षक तक्रारीसाठी पुढे आल्यास शाळा व्यवस्थापन सूडबुद्धीने त्याला त्रास देऊ शकते. यामुळे शिक्षक व पालक दडपणाखाली असतानाच, पालिकेचा शिक्षण विभागही हात झटकत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न
मंगळवारऐवजी बुधवारी महाशिवरात्री असल्याचे सांगून, व्हॅलेंटाइन डेला सुट्टीचे लेखी पत्र काढून शाळेचे मुख्याध्यापक वादात सापडले आहेत; परंतु प्रकरण अंगलट येत असल्याचे समजताच उपमुख्याध्यापकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेच्या शिक्षकांनाही त्यांना भेटण्यासाठी अपॉइमेंट घ्यावी लागत आहे, अशा अनेक प्रकारांबाबत शिक्षकांनी आवाज उठवूनही अद्याप ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
भाच्याच्या अॅडमिशनची शिफारस
व्हॅलेंटाइन डेला सुट्टी देऊन अडचणीत आलेल्या डी.पी.एस. शाळा व्यवस्थापनाला धाक दाखवून एका अधिकाºयाने भाच्याच्या अॅडमिशनची शिफारस केल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे दीड तास हे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी सुट्टीच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करत आपल्याही भाच्याचे अॅडमिशन करायचे असल्याचे सांगत, त्या अधिकाºयाने आयती संधी साधून घेण्याचा प्रयत्न केल्याचा शिक्षकांचा आरोप आहे.