कर्जत : शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षासाठी गणवेश वाटप झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश घालून शाळेत यावे लागत आहे. कर्जत तालुक्यात इयत्ता पहिली ते सातवीमध्ये २८१ शाळांमधील १३ हजार ९३६ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानकडून गणवेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे जुने गणवेश घालूनच विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानकडून तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या गणवेशाचा खर्च जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानतर्फे केला जातो. तर अनुसूचित जाती आणि जमाती तसेच दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबातील मुलांना देखील गणवेश शिवून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रत्येक विद्यार्थ्यावर ४00 रु पये खर्च करते. त्यात मुले आणि मुलींना गणवेशाचे प्रत्येकी सेट शिवून येतील, असे नियोजन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे आहे. जिल्हा परिषदेची संबंधित यंत्रणा विद्यार्थ्यांचा पट लक्षात घेवून मे महिन्यातच निधी तालुक्यातील सर्व शिक्षा अभियान समन्वयकांकडून प्राथमिक शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यावर आॅनलाइन जमा करते. त्यानंतर कर्जत तालुक्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देण्याचे काम शालेय व्यवस्थापन समितीकडून केले जाते. मात्र यंदा विद्यार्थ्यांना अद्याप नवीन गणवेश दिले नसल्याचे कर्जत सर्व शिक्षा अभियानकडूनही मान्य केले आहे. तालुक्यासाठी ५४ लाखांचा निधी १२ जुलैला प्राप्त झाला आहे. निधी मिळण्यास विलंब झाला आहे. मात्र तरीही आम्ही सर्व २८१ शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.- वर्षा कोले, लेखा अधिकारी, सर्व शिक्षा अभियान, कर्जत
शालेय विद्यार्थी यंदाही नवीन गणवेशाविना
By admin | Published: July 15, 2015 10:50 PM