उरण : उरण, वाशी व डोंबिवली येथील तीन शालेय जलतरणपटूंनी मॅनमार ते बांगलादेश दरम्यानची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टिन आयलंड चॅनेलजची १७ कि.मी. अंतराची खाडी पोहून पार केली. राज पाटील केगाव-उरण, वेदांत सावंत वाशी, डॉली पाटील, डोंबिवली अशी त्या मुलांची नावे आहेत. राज पाटील (११) हा उरण येथील एनआय हायस्कूलचा विद्यार्थी आहे. वेदांत सावंत (११) हा वाशी येथील फादर अॅग्नेल शाळेचा, तर डॉली पाटील (१२) ही नेटिव्ह स्कूलची विद्यार्थिनी आहे. पोहण्याची आवड असलेल्या जलतरणपटूंनी याआधी मोरा-गेटवे आणि इतर खाड्या यशस्वी पार केल्या आहेत. त्यामुळे मनोबल वाढलेल्या या विद्यार्थ्यांनी मॅनमार ते बांगलादेश दरम्यानची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टिन आयलंड चॅनेलची १७ किमी अंतराची खाडी पोहून पार करण्याचा निश्चय केला. सरावानंतर हे तिघेही जलतरणपटू बांगलादेशला रवाना झाले. त्यांनी शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी मॅनमार ते बांगलादेश दरम्यानची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टिन आयलंड चॅनेलची १७ किमी अंतराची खाडी यशस्वीरीत्या पोहून पार केली, अशी माहिती राज पाटील यांचे प्रशिक्षक संतोष पाटील यांनी दिली. देशाचे नाव उज्ज्वल करून सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या या मुलांवर सर्व स्तरावरून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. १४ फेब्रुवारीला तीनही जलतरणपटू मायदेशी परतणार असल्याची माहितीही संतोष पाटील यांनी दिली. (वार्ताहर)
शालेय जलतरणपटूंनी केली मॅनमारची खाडी पार
By admin | Published: February 13, 2017 5:10 AM