महासभेत स्कूल व्हिजनचे वाभाडे, शाळांमध्ये शिक्षकांसह सुविधांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:08 AM2018-03-21T01:08:12+5:302018-03-21T01:08:12+5:30
प्रशासन मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. अनेक शाळांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. खासगी शाळा चालाव्या यासाठी जाणीवपूर्वक मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघाती आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला आहे.
नवी मुंबई : प्रशासन मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. अनेक शाळांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. खासगी शाळा चालाव्या यासाठी जाणीवपूर्वक मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघाती आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला आहे.
महापालिका शाळांमधील गैरसोयींविषयी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. पालिकेने ऐरोली व नेरूळमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. या शाळांना चांगला प्रतिसाद लाभला, परंतु प्रशासन पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देत नाही. वारंवार मागणी करूनही विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी शिक्षण संस्था चांगल्या चालाव्या यासाठीच पालिका शाळांकडे दुर्लक्ष केले जात असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका असा इशारा सूरज पाटील यांनी यावेळी दिला. क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस यांनीही प्रशासनावर टीका केली. सीवूडमध्ये सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. इमारत बांधून तयार आहे, पण अद्याप शाळा सुरू झालेली नाही. प्रशासन शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. सीबीडी परिसरामध्ये माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची मागणी करूनही शिक्षणाधिकारी लक्ष देत नाहीत. शाळेला भेट देण्यासाठी येत नसल्याची टीका सुरेखा नरबागे यांनी केली. कोपरखैरणेमधील नगरसेविका मेघाली राऊत यांनीही प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. तीन वर्षे सातत्याने मनपा शाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी पाठपुरावा करत आहे. पण आम्ही केलेल्या पाठपुराव्याकडे लक्ष दिले जात नाही. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व चांगल्या सुविधा देता येत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी गरीब घरातील मुलांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत ही शोकांतिका आहे. लाभाचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु पालिकेमधील भ्रष्ट यंत्रणेमध्ये नगरसेवकांना काम करणे अवघड जाते. पालक एका विद्यार्थ्याच्या गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी किती पाठपुरावा करेल असा प्रश्न उपस्थित केला. शिक्षणासाठी अर्थसंकल्पात असलेली रक्कम खर्च करता येत नाही. अशीच स्थिती राहिली तरी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. माजी उपमहापौर अविनाश लाड यांनीही शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका केली. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, गणवेश नाही, बेंच नाहीत, मुलांना अत्यावश्यक सुविधा नाहीत. स्कूल व्हिजनचे भजन झाले असून गरिबांच्या मुलांची थट्टा सुरू असल्याचा आरोप केला. शिक्षणाविषयी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या वेळी केली.
ठोक मानधनावरील शिक्षकांना कमी वेतनावर राबवून घेतले जात आहे. त्यांना वेतनवाढ देण्यात यावी.
- ज्ञानेश्वर सुतार,
नगरसेवक प्रभाग ८९
स्कूल व्हिजनचे भजन झाले आहे. गरिबांच्या मुलांना वेठीस धरले जात आहे.
- अविनाश लाड, माजी उपमहापौर
शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद असतानाही दुर्दैवाने खर्च केला जात नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.
- सुधाकर सोनावणे, माजी महापौर
शिक्षकांना कमी वेतन दिले जात आहे. शिक्षणाविषयी अपयशाचे खापर दुसºयावर फोडण्याचे प्रकार सुरू आहेत.
- किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेना
मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरीब मुलांना चांगल्या सुविधा दिल्या जात नसतील तर त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत.
- द्वारकानाथ भोईर,
गटनेते शिवसेना
मनपा शाळांची स्थिती बिकट आहे. अनेक वर्गामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुले बसविली जात आहेत.
- घनश्याम मढवी,
नगरसेवक राष्ट्रवादी
घणसोलीमध्ये शाळेची नवीन इमारत बांधली आहे पण विद्यार्थ्यांना बेंच व इतर वस्तू जुन्याच असून चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत.
- कमलताई पाटील,
नगरसेविका प्रभाग ३४
प्रशासनाने विद्यार्थ्यांची अडवणूक थांबविली पाहिजे. शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
- संजू वाडे, नगरसेवक प्रभाग १२
शिक्षण विभागातील ज्या त्रुटी सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्यांचा विचार करून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.
- जयवंत सुतार, महापौर
शिक्षण विभागाच्या कामकाजावर यापूर्वीच लक्षवेधी मांडली होती परंतु दुर्दैवाने ती पटलावर घेतली नव्हती. आतातरी सदस्यांनी सुचविलेले बदल करण्यात यावेत.
- मंदाकिनी म्हात्रे, उपमहापौर
विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी वेळ पडली तर सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्र्यांनाही भेटू.
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते
शिक्षण विभागाची वाताहत होत असताना स्वत:ला शिल्पकार म्हणविणारे नेते काय करत होते. सत्ताधारी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत.
- रामचंद्र घरत, गटनेते, भाजपा
खासगी शिक्षण संस्था चांगल्या चालाव्या यासाठी प्रशासनाकडून मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय येत आहे.
- सूरज पाटील, नगरसेवक राष्ट्रवादी
शिक्षण विभागातील अनागोंदी हे सत्ताधाºयांचे अपयश असून सद्यस्थितीमध्ये संगीत शिक्षक, संगणक शिक्षक नाहीत. अभ्यासक्रम शिकविण्यासाठीही शिक्षकांची कमतरता आहे.
- सोमनाथ वास्कर,
नगरसेवक प्रभाग ७४