शाळेचा पाणीपुरवठा खंडित
By admin | Published: November 18, 2016 02:53 AM2016-11-18T02:53:00+5:302016-11-18T02:53:00+5:30
रद्द केलेल्या नोटा मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर भरलेला नाही
भार्इंदर : रद्द केलेल्या नोटा मीरा-भार्इंदर महापालिकेने करवसुलीच्या माध्यमातून स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर भरलेला नाही. अशा थकबाकीदारांचा पाणीपुरवठाच खंडित करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. १९ लाखांचा कर थकवल्याने एका शाळेचा पाणीपुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला.
नित्यानंद प्रबोधिनी विद्यालय असे शाळेचे नाव आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख वासुभाई नांबियार यांच्या नियंत्रणाखाली ही शाळा चालवली जाते. त्यात हिंदी माध्यमाचे सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील मराठी माध्यमाचे शिक्षण पुरेशा पटसंख्येअभावी बंद झाल्याने तूर्तास हिंदी माध्यमाचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सध्या सुरू आहे.
शाळेच्या प्राथमिक विभागासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळते. एकूण १० शिक्षक येथे आहेत. या शाळेचा अंदाजे पाच वर्षांचा १९ लाखांचा मालमत्ताकर थकीत असल्याने पालिकेने अनेकदा शाळेला नोटिसा पाठवल्या. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही शाळा थकबाकीदारांच्या यादीत समाविष्ट झाली.
करवसुलीसाठी पालिकेने राजकीय दबावाखाली केवळ कागदी घोडे नाचवून कारवाई बासनात गुंडाळली. अखेर हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने त्या कराच्या माध्यमातून कर स्वीकारण्यास पालिकेने सुरुवात केल्यानंतर थकीत कराच्या वसुलीला जोमाने सुरुवात झाली.
करवसुली प्रभावीपणे राबवण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी थेट पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला बळी १४ नोव्हेंबरला भार्इंदर पश्चिमेकडील रॉयल रेसिडन्सी ही इमारत ठरली. सध्या या इमारतीमधील रहिवासी टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत.
यानंतर, मोठ्या थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आयुक्तांनी त्यांची यादीच प्रभाग अधिकाऱ्यांकडे सोपवली. हे अधिकारी सध्या त्या थकबाकीदारांचा शोध घेऊन कर जमा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करीत आहेत.
कर भरण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या मीरा गावठाणमधील नित्यानंद शाळेचा पाणीपुरवठा बुधवारी खंडित केला. काही दिवसांपूर्वी शाळेने सुमारे ७ लाखांचा कर पालिकेत जमा केल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, उर्वरित कर अद्याप थकीत राहिल्याने कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.
यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सोबत जास्तीतजास्त पाणी घेऊन यावे लागत असून इतर वापरासाठी आसपासच्या वस्तीतून पाण्याची सोय केली जात आहे. (प्रतिनिधी)