नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:14 AM2019-08-13T02:14:23+5:302019-08-13T02:14:50+5:30
नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय
पालिकेने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला जाणार आहे.
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वच्छ भारत अभियानामध्येही देशपातळीवर महापालिकेने ठसा
उमटविला आहे. पाणीपुरवठ्यासह चांगल्या पायाभूत सुविधा शहरात उपलब्ध असून महापालिकेने शहराच्या नावलौकिकामध्ये भर टाकणारे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे.
ऐरोलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व घणसोलीमधील सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. नेरूळ सेक्टर १९ ए मधील जवळपास १ लाख ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ परिसरामध्ये वंडर्स पार्क उभारण्यात आले आहे. उद्यानामधील जवळपास ३५ हजार चौरस मीटरचा भूखंड विज्ञान केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आला असून तेथे राज्यातील सर्वोत्तम केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
केंद्राचा पहिला टप्पा २० हजार चौरस मीटरवर सुरू केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी व सर्व वयोगटामधील नागरिकांना व मुलांना विज्ञान क्षेत्राबद्दल कुतूहल निर्माण होऊन माहिती मिळेल अशाप्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित वास्तुसंकुल व पायाभूत सोयी, सुविधा या जागतिक दर्जाच्या राहतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मनुष्याच्या भावी आयुष्याला कशाप्रकारे प्रभावित करतील या संकल्पनेवर आधारित हे केंद्र असणार आहे.
नवी मुंबई हे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची केंद्रे या ठिकाणी आहेत. देशभरातून विद्यार्थी शिक्षण
घेण्यासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी व त्यांच्यामधून भविष्यात विज्ञानप्रेमी तयार करता यावे या
उद्देशाने महापालिकेने विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ८७ कोटी २७ लाख रुपये अंदाजित रक्कम दिली आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींपेक्षा जास्त
खर्च होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये याचा समावेश होत आहे. राज्यातून व देशातूनही विद्यार्थी व नागरिक या केंद्रास भेट देतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
विज्ञान केंद्रातील महत्त्वाचे पैलू जीवन
- मानवी जीवनावर सद्यस्थितीतील वातावरणाचा प्रभाव काय असणार याची माहिती ऊर्जा - भविष्यातील उर्जेचे स्त्रोत कोणते असतील याविषयी माहिती
पर्यावरण - पर्यावरण पूरक राहणीमान म्हणजे नक्की काय याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणार
अंतराळ - अंतराळविषयी माहिती, पृथ्वी व्यतिरिक्त कुठे निवास होवू शकतो व इतर सर्व माहिती
यंत्र व रोबोट - मानवी जीवनावर यंत्र व रोबोट यांचा परिणाम व भविष्यातील स्थिती.
लौकिकामध्ये भर पडणार
नवी मुंबई सुनियोजीत शहर असले तरी याठिकाणी अवर्जुन भेट द्यावी असे प्रकल्प नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. येथील नागरिकांना मुंबईतील सायन्स सेंटर, वस्तूसंग्रहालय, प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी जावे लागत होते.
महापालिकेने चांगली उद्याने उभारली आहेत. शासनाने ऐरोलीमध्ये जैवविविधता केंद्र सुरू केले आहे. बेलापूर किल्याचेही सिडकोकडून
सुशोभीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये आता विज्ञात केंद्राची भर पडणार असून त्यामुळे शहराचा नावलौकीक वाढणार आहे.
वंडर्सपार्कमध्ये उपलब्ध असलेल्या भूखंडावर जागतीक दर्जाचे विज्ञात केंद्र उभारण्यात येणार आहे. वैज्ञानीक दृष्टीकोण वाढीस लावण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी निवीदा प्रक्रिया सुरू केली आहे.
- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता