इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:39 AM2021-02-10T00:39:16+5:302021-02-10T00:39:34+5:30
अन्य वस्तूंच्याही किमती वाढल्या : सर्वसामान्यांकडून तक्रारींचा सूर
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : इंधनाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मागील चार महिन्यांत इंधनाच्या किमतीतील वृद्धीने अन्य वस्तूंचे दर वाढून महिन्याचे आर्थिक वेळापत्रक कोलमडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून तक्रारीचा सूर उमटत आहे. दरम्यान, सातत्याने इंधन दरवाढीबाबत शासनाने तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेशातील इंधनाच्या प्रतिलिटरच्या दरातील तफावतीमुळे राज्य शासनाविरोधातील तक्रारीचा सूर नागरिकांमध्ये वाढत आहे. मागील चार महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत पेट्रोल व डिझेलच्या प्रतिलिटरच्या किमतीत वृद्धी झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८८.२९, तर डिझेल ७६.२१ रुपये होता. डिसेंबर महिन्यात पेट्रोल ८९.६०, डिझेल ७८.३२ दर झाला. महिन्याभरात पेट्रोलच्या दरात ०.६९ पैसे, तर डिझेलच्या दरात २ रुपये ११ पैशांनी वाढ झाली. २१व्या शतकातील नव्या दशकाच्या प्रारंभी १ जानेवारी रोजी पेट्रोल ९०.८४ आणि डिझेल ७९.७७ वर पोहोचले. डिसेंबर महिन्यातील दरापेक्षा जानेवारी महिन्यात पेट्रोलच्या किमतीत १ रुपया २४ पैशांनी वाढ झाली. डिझेल दरात १ रुपया ४५ पैशांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर ९३.२७ आणि डिझेल ८२.४१ रुपयांवर पोहोचले. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत पेट्रोल २ रुपये ४३ पैशांनी, तर डिझेल २ रुपये ६४ पैशांनी महाग झाले. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी काही वर्षांच्या तुलनेत मोठी मजल मारली असून, आजचे दर ९४.१४ रुपये झाले आहेत, तर डिझेलने ८३.३६ रुपयांचा आकडा गाठला आहे.
१ नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत आजचे दर हे पेट्रोल ५ रुपये आणि ८५ पैशांनी, तर डिझेल दरात ७ रुपये १५ पैशांनी उसळी घेतली आहे. सामान्यांना हे दर परवडणारे नसल्याने, वाढत्या महागाईच्या काळात जगायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.
दिवसेंदिवस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक वेळापत्रक सांभाळणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढलाच पाहिजे.
- उमेश चुरी, नागरिक, डहाणू
सर्वसामान्यांना आता स्वत:चे वाहन वापरणे अशक्य होणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवेचा लाभ घेऊन काहीअंशी दिलासा मिळेलही, मात्र हा इलाज नव्हे. इंधनाच्या किमतीतील वाढ खिशाला कात्री लावणारी आहे.
- राकेश सावे, नागरिक, बोर्डी