कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास वाव - पी. वेलरासू
By कमलाकर कांबळे | Published: April 30, 2024 04:10 PM2024-04-30T16:10:48+5:302024-04-30T16:11:20+5:30
कोकण विभागाच्या आयुक्तपदाचा पी. वेलरासू यांनी पदभार स्वीकारला
नवी मुंबई : कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सूलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
वेलरासू यांनी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची एसआरए विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची कोकण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. वेलरासू हे २००२च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत.
पी. वेलरासू यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. कोकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पी. वेलरासू यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. आणि कोकण भवन मधील महत्त्वाच्या विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केली.