ठाण्यात मिळणार स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण
By admin | Published: August 18, 2015 12:38 AM2015-08-18T00:38:04+5:302015-08-18T00:38:04+5:30
ठाण्यातील जलतरणपटूंना आता स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, कळवा येथील कै. यशवंत रामा साळवी तरणतलावात
ठाणे : ठाण्यातील जलतरणपटूंना आता स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, कळवा येथील कै. यशवंत रामा साळवी तरणतलावात ते सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे. परंतु, या प्रशिक्षणासाठी एका विद्यार्थ्याला पाच हजार मोजावे लागणार आहेत.
कळव्यातील हा तरणतलाव आॅलिम्पिक दर्जाचा असून येथे हे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी डॉ. विश्वास सापटणेकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. आजच्या युवकांना स्कूबा डायव्हिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिल्यास त्यांना भारतीय सेवा दलात जीवरक्षक म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच पूर, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अशा प्रशिक्षित युवकांचा बचावकार्यासाठी उपयोग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुढाकार घेऊन त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता ४ लाख ५ हजार ५०० रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. हा खर्च प्रशिक्षणासाठी आवश्यक उपकरणांचा असून हा खर्च पालिका करणार आहे. ही योजना सुरू केली तर एका बॅचमध्ये पाच प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे.