नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाचे नाव सांगून पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पक्षपाती कारवाई सुरू आहे. वाशी सेक्टर २मधील झेरॉक्स गल्लीमध्ये निवासी इमारतीमध्ये ३६ व्यावसायिक गाळे सुरू केले आहेत. पालिकेने वाणिज्य वापराचा ठपका ठेवून फक्त दोन दुकानेच सील केली आहेत. या पक्षपाती कारवाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सहा महिन्यांमध्ये अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमणांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचा व अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाचा सोयीप्रमाणे अर्थ काढला जात आहे. शहरातील अतिक्रमणांवर पक्षपातीपणे कारवाई केली जात आहे. सर्वसामान्य व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेसमध्ये ठेवलेल्या वस्तूंवर कारवाई केली; पण धनाढ्य हॉटेल व्यावसायिकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे. स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांच्या मुलाच्या अतिक्रमणावरून पाटील दाम्पत्याचे नगरसेवकपद रद्द केले; पण शहरातील इतर ७३ लॉजवर कारवाई केलेली नाही.वाशी सेक्टर २मध्येही अशाच प्रकारे पक्षपाती कारवाई करण्यात आली आहे. झेरॉक्स गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या विभागात अपोलो स्टेशनर्स व त्याच्या बाजूला असलेले दुकान सील केले आहे. निवासी जागेचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई केली आहे, पण या कारवाईविषयी या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. झेरॉक्स गल्लीमध्ये निवासी जागेत तब्बल ३६ दुकाने आहेत. त्यापैकी २ दुकानांवरच कारवाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाशीमधील ज्या दुकानांवर कारवाई केली त्याविषयी माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कारवाई केली. इतर दुकानांची तक्रार नसल्याने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. अतिक्रमण विभाग कोणाच्या तरी तालावर नाचत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदला घेण्यासाठी वापर शहरामध्ये अनेक नागरिक बदला घेण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा वापर करत आहेत. कोणाशी वैयक्तिक भांडण झाले की त्यांच्या अतिक्रमणाविषयी तक्रारी केल्या जात आहेत. काहीजण माहिती अधिकाराचाही दुरूपयोग करत आहेत. तक्रारदारांच्या दबावामुळे पालिका प्रशासन पक्षपाती कारवाई करू लागले आहे.
दोनच दुकाने केली सील
By admin | Published: January 13, 2017 6:21 AM