प्रभागवार मतदान यंत्रे सील
By admin | Published: May 18, 2017 04:21 AM2017-05-18T04:21:55+5:302017-05-18T04:21:55+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणारी मतदान यंत्रे उमेदवारांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. आता ही मशिन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात
- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणारी मतदान यंत्रे उमेदवारांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. आता ही मशिन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार असून २३ मे रोजी बाहेर काढून मतदार केंद्रावर रवाना करण्यात येतील, अशी माहिती प्रभाग १७ ते २० चे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.
मतदान यंत्रामध्ये गडबड करता येते असा आरोप सध्या अनेक राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. याबाबत न्यायालयात ही तक्रार करण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात येणारी यंत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यावर बुधवार, १७ मे रोजी सकाळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर त्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या शंकांचे समाधान करून ती सील करण्यात आली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
वाहनांची कसून तपासणी
निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून दारू आणल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत आढळून आले आहे. निवडणुकीत मतदारांना वळवण्यासाठी व आमिष दाखविण्यासाठी विविध प्रयत्न काही जणांकडून केले जातात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दारू, पैसे वाटपाबरोबर वेगवेगळी आमिषे दाखविणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
मद्य आणि काळ्या पैशावर नियंत्रणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्राप्तिकर विभाग आणि पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यासाठी नाके तयार करण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या काळात परिसरात दारू व मटणाच्या पार्ट्या रंगत आहेत. कार्यकर्त्यांना जेवणावळी, दारूच्या पार्ट्या, तर मतदारांना भेटवस्तूंचे वाटप, सोसायट्यांची करून दिलेली कामे, मतदानासाठी थेट पैसे, वीज, फोन बिल भरणे असे प्रकार पनवेल परिसरात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मतदानाच्या मशिनमध्ये घोटाळा करणे शक्य नाही, कारण ही मशिन कोठून येणार हे कोणालाच माहीत नसते. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे नाव कोणत्या मतदान यंत्रावर किती क्र मांकावर असेल हे आधी माहीत नसते. मतदान यंत्रे आल्यावर सील करून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतात. मतदान केंद्रावर पुन्हा प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यामुळे त्यामध्ये गडबड करणे शक्य नाही.
- ज्ञानेश्वर खुटवड, निवडणूक निर्णय अधिकारी