शोध २२,३३० आरोपींचा

By admin | Published: January 24, 2016 01:45 AM2016-01-24T01:45:56+5:302016-01-24T01:45:56+5:30

पोलीस आयुक्तालयामध्ये शोध न लागलेल्या गुन्ह्यांचा बॅकलॉग वाढत असून, त्याच प्रमाणात गुन्ह्यांमधील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची संख्याही वाढत आहे. नवी मुंबई, पनवेल

Search 22,330 accused | शोध २२,३३० आरोपींचा

शोध २२,३३० आरोपींचा

Next

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
पोलीस आयुक्तालयामध्ये शोध न लागलेल्या गुन्ह्यांचा बॅकलॉग वाढत असून, त्याच प्रमाणात गुन्ह्यांमधील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची संख्याही वाढत आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातील २० पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल २२,३३० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यापैकी ३०४ जणांना फरार घोषित करण्यात आले असून, यामध्ये छोटा राजन, रवी पुजारीसह अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. देशातील सर्वात वेगाने विस्तार होणाऱ्या शहरांमध्ये या परिसराचा समावेश आहे. जगातील मोठ्या उद्योजकांमध्ये समावेश असणाऱ्या रिलायन्स समूहाची हेड कॉर्टर याच परिसरात आहे. देशातील सर्वात मोठे जेएनपीटी बंदर व आशिया खंडातील सर्वात माठी बाजार समिती या परिसरात आहे. ठाणे, बेलापूरसह तळोजा औद्योगिक वसाहती पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. नवी मुंबई व दक्षिण नवी मुंबई ही दोन्ही शहरे देशातील पहिली स्मार्ट सिटीची मानकरी ठरण्याची शक्यता आहे. विमानतळ, मेट्रो, नैना परिसरामुळे पुढील पाच वर्षांत ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. परिसराच्या विकासाबरोबर येथील गुन्हेगारी व तिचे स्वरूपही बदलू लागले आहे. पूर्वी चोरी, घरफोडीचे गुन्हे सर्वाधिक होत होते. आताही हे प्रमाण गंभीर असले तरी त्याहीपेक्षा फसवणूक, सायबर गुन्ह्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या परिसरात बांधकाम व्यवसाय तेजीत असल्याने संघटित गुन्हेगारी टोळ्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याहीपेक्षा जास्त आव्हान प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा करणे व आरोपींना शोधण्याचे आहे. नवी मुंबईमध्ये १९७९ पासून मारामारी, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांमधील २२,३३० आरोपी पोलिसांना हवे आहेत. प्रलंबित गुन्ह्यांमध्ये १९९५ ते २००५ या १० वर्षांतील घटना मोठ्या प्रमाणात आहेत.
आयुक्तालय क्षेत्रामध्ये फरार गुन्हेगारांच्या यादीमध्येही वाढ होत आहे. अनेक कुख्यात गुंडांचा शोध पोलीस घेत आहेत. सर्वाधिक न्हावाशेवा पोलीस ठाणे क्षेत्रातून १०० गुन्हेगार फरार घोषित आहेत, तर रबाळे पोलीस ठाणे हद्दीतून ६२ गुन्हेगार फरार आहेत. काही वर्षांपूर्वी ऐरोलीतील गुन्हेगारी पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत होती. पंजाब व महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींनी पोलीस अधिकारी बाबासाहेब आढाव व हवालदार भिकू मारुती करडे यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये आढाव जागीच ठार झाले होते.
याच परिसरात गोपाळ सैंदाने यांचीही भंगारमाफियांनी हत्या केली होती. पोलिसांना अनंत काळे, विश्वास पाटील यांची हत्या व फिनलँडमधील महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यांमधील आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत.

पाहिजे असलेले व फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अनेक गुन्हेगार इतर राज्यात व विविध आयुक्तालयांत लपलेले असल्याने त्यांच्या अटकेसाठी सहकार्याचे आवाहन तिथल्या पोलीस आयुक्तालयांना करण्यात आले आहे. शिवाय फरार गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठवला आहे.
- दिलीप सावंत,
गुन्हे शाखा उपायुक्त.

Web Title: Search 22,330 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.