खारघरमध्ये बुडालेल्या चौथ्या विद्यार्थिनीचा शोध सुरूच; ड्रोन कॅमेऱ्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 03:49 AM2019-08-05T03:49:00+5:302019-08-05T03:49:03+5:30
रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.
पनवेल : खारघरमधील गोल्फ कोर्सजवळील धबधब्याच्या ओढ्यातून शनिवारी सकाळी वाहून गेलेल्या चार विद्यार्थिनींपैकी तिघींचे मृतदेह सापडले होते. मात्र चौथी विद्यार्थिनी नेहा दामाचा मृतदेह शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोधपथकाच्या हाती न लागल्याने अखेर मोहीम थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी खारघर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली; मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नेहाच्या पालकांसह नातेवाइकांनी खारघर गोल्फ कोर्स परिसरात गर्दी केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. मृतदेह अडकण्यासाठी गोल्फ कोर्स येथील ओढ्यात खारघर पोलिसांनी जाळी बांधली. मुसळधार पावसामुळे मृतदेह कोपरा खाडीत वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह शोधण्यासाठी खारघर पोलिसांनी ड्रोन कॅमेºयाचीही मदत घेतली होती. मात्र रात्रीपर्यंत शोध लागला नाही.
रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून शोधमोहिमेला सुरुवात केली. मृतदेह शोधण्यासाठी ड्रोन कॅमेºयाचादेखील आधार घेतला. मात्र मृतदेह हाती लागला नाही.
- प्रदीप तिदार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे)
कॉलेजला जाते असे सांगून नेहा खारघरला आली होती. पोलीस ठाण्यातून फोन आल्यावर आम्हाला या घटनेची माहिती मिळाली.
- परेश भानुशाली,
नेहा दामाचे नातेवाईक