प्रशांत शेडगे, पनवेलराज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल कार्यालय गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी भाड्याच्या जागेत आहेत. ही जागा अपुरी पडत असून येथे सुविधांची वानवा आहे. त्यामुळे आपली हक्काची व कायमस्वरूपी जागा असावी याकरिता या विभागाची शोध मोहीम सुरू आहे. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीत पनवेल कार्यालय आहे. पनवेल आणि उरणच्या काही भागाचा त्यामध्ये समावेश होतो. विविध बार परमिट रूम याची तपासणी करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, गावठी दारूविरोधात कारवाई करणे त्याचबरोबर बनावट मद्यसाठा, विक्र ी व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारणे, शासनाला उत्पादन शुल्कातून अधिकाधिक महसूल मिळवून देणे, नोकरनामे तपासणे त्याचबरोबर इतर परवाने आदी विविध कामांचा भार या कार्यालयावर आहे. एकंदरीत पनवेल कार्यालयावर अधिक भार असून या ठिकाणाहून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला जातो. असे असतानाही कार्यालयाची स्थिती अतिशय बिकट आहे. मिडल क्लास सोसायटीत हाय पॉइंट इमारतीतील एका घरात कारभार गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे. ६०० चौरस फूट जागा अतिशय अपुरी पडत आहे. त्याचबरोबर ही इमारत अतिशय जुनी झाली असल्याने गळती लागल्याने अनेकदा कागदपत्रे भिजण्याचे प्रकार घडले आहेत. दारू पकडल्यानंतर हा मुद्देमाल ठेवण्याकरिताही जागा शिल्लक रहात नाही.
उत्पादन शुल्क जागेच्या शोधात
By admin | Published: October 15, 2015 2:04 AM