पोलीसमित्रांकरिता शोधमोहीम सुरू
By admin | Published: November 23, 2015 01:21 AM2015-11-23T01:21:39+5:302015-11-23T01:21:39+5:30
राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी अलीकडेच आपल्या ठाणे भेटीत जिल्ह्यात मोठ्या संख्येने पोलीसमित्र नियुक्त करण्याचे आदेश दिल्यावर आता पोलीसमित्रांकरिता
ठाणे : राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी अलीकडेच आपल्या ठाणे भेटीत जिल्ह्यात मोठ्या संख्येने पोलीसमित्र नियुक्त करण्याचे आदेश दिल्यावर आता पोलीसमित्रांकरिता शोधमोहीम सुरू झाली असून त्याकरिता रविवारी ठिकठिकाणी जनजागृती मोहीम घेण्यात आली. प्रभातफेऱ्या, रॅली काढून पोलीसमित्र जोडण्यास गती प्राप्त झाली आहे.
ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने ठाणे शहर आयुक्तालयाकडून नेहमीच विधायक पावले उचलली जातात. भरदिवसा रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातून मौल्यवान सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या बाइकस्वारांना लगाम घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी नागरिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ठाणेकर नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण व्हावी, यासाठी आयुक्तालयातील सर्व ठाण्यांतील पोलिसांनी आपापल्या हद्दीत प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या उपक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
ठाणे आयुक्तालयातील परिमंडळ-१ चे उपायुक्त सचिन पाटील आणि परिमंडळ-५ चे उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी त्या-त्या परिमंडळातून पोलीस ठाण्यात प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या प्रभातफेरीत त्या प्रभागातील पोलीसमित्र, दक्ष नागरिक, शांतता, मोहल्ला कमिटी व सुजाण जनतेने सहभाग घेतला होता.
या वेळी ‘पोलीसमित्र बनू या, गुन्हेगारांना रोखू या...’ या माध्यमातून ‘साखळी चोरट्यांना पकडू या’ आदी घोषणांचे फलक घेऊन ठाणेकर नागरिकांसह लोकप्रतिनिधी, समाजसेवकांनी मोहिमेला पाठिंबा दर्शविला.
कल्याण-डोंबिवलीतही जनजागृतीपर प्रभातफेरी
कल्याण : पोलीसमित्र संकल्पनेंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्येही पोलिसांच्या पुढाकाराने रविवारी जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीत ईगल ब्रिगेड, महिला दक्षता समिती, निर्भया महिला ग्रुपच्या सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. कल्याणमध्येही प्रभातफेरीला चांगला प्रतिसाद लाभला. पोलीसमित्र अभियानांतर्गत गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. रविवारी कल्याण परिमंडळ-३ परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही पोलीसमित्र जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभियानाला सुरुवात झाली. रविवारचा सुटीचा दिवस असूनदेखील नागरिकांचा सहभाग यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी देशभक्तिपर गीते लावण्यात
आली होती.
भार्इंदर : मीरा-भार्इंदरकर जनतेत जागरूकता येत असून त्यात आणखी वाढ व्हावी आणि पोलिसांनाही जनतेचे सहाकार्य लाभावे, यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. येथील पोलीस विभाग देशात एफआयआर अॅपच्या वापराबाबत प्रथम ठरला असून महिला व ज्येष्ठ नागरिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे हे अॅप नागरिकांत प्रामुख्याने महिलांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या अॅपचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा, यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश अंबुरे यांनी रविवारी आयोजित पोलीसमित्र रॅलीत केली. पोलीसमित्रांनी शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, जेणेकरून गुन्ह्यांवर वेळीच नियंत्रण ठेवता येणे शक्य होईल. तसेच वेळोवेळी आवश्यक ठरणाऱ्या पोलीस दलाच्या कामांत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
‘‘परिमंडळ-१ मधील सहा पोलीस ठाण्यांत आतापर्यंत सुमारे १५०० ते १८०० पोलीसमित्र झाले आहेत. तसेच जनजागृतीसाठी प्रत्येक रविवारी प्रभातफेरी काढण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून जनजागृती निर्माण होणे महत्त्वाचे आहे.’’
- सचिन पाटील,
पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१
‘‘परिमंडळ-५ मधील सहा पोलीस ठाण्यांत आतापर्यंत अंदाज ८०० ते ९०० पोलीसमित्र झाले आहेत. यासाठी सर्व जातीधर्मांच्या लोकांचा प्रतिसाद आवश्यक आहे. तसेच लोकसहभागही महत्त्वाचा आहे.’’
- व्ही.बी. चंदनशिवे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-५