नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीमधील दुकाने सुरू करण्यात आली असून, मॉल लवकरच खुला केला जाणार आहे. व्यावसायिक गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले आहे. वाहनतळ, तिकीट खिडकी व इतर सुविधा देण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सर्वात भव्य रेल्वे स्टेशन म्हणून सीवूड ओळखले जाणार आहे. पाच वर्षांपासून रेल्वे स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. एल अँड टीला ठेका देताना सर्वात प्रथम रेल्वे स्टेशन व प्रवाशांसाठीच्या यंत्रणा उभारण्यास प्राधान्य देण्याची अट घातली होती. पण प्रत्यक्षात प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. व्यावसायिक इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीसाठी तात्पुरते भोगवटा प्रमाणपत्र घेतले असून २३ मार्चला १५ दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बिग बाजार मॉल लवकरच सुरू केला जाणार आहे. गुरूवारी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रशासनाने केलेल्या घाईमुळे रेल्वे प्रवाशांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सीवूडमधील नागरिक अनेक वर्षांपासून गैरसोय सहन करत आहेत. सिडकोने प्रथम तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे स्थानक उभारले, पण प्रत्यक्षात तिथे रेल्वे थांबत नसल्याने रहिवाशांना आंदोलन करावे लागले. आंदोलनानंतर स्थानक सुरू केले. पण चार ते पाच वर्षांमध्ये तिथे भव्य रेल्वे स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन स्थानकासाठीचे काम सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूला फक्त एका बाजूने रेल्वे स्टेशनमध्ये जाण्याचा मार्ग ठेवण्यात आला. यामुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पाच वर्षे झाली तरीही अद्याप रेल्वे प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी योग्य प्रवेशद्वार तयार केलेले नाहीत. ज्येष्ठ नागरिक, अपंगांची गैरसोय होत आहे. प्रवाशांनी अजून किती वर्षे गैरसोय सहन करायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्टेशन इमारतीमध्ये कामे मिळविण्यासाठी सर्वजण भांडत आहेत. पण प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी मात्र कोणीही फारसे प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण राजकीय पद व वशिलेबाजी करून काही जण दमदाटी करून छोटी - मोठी कामे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:ला कामे मिळाली की प्रवाशांच्या सुविधांकडे मात्र कोणीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. (प्रतिनिधी)
सीवूड स्थानकात प्रवाशांच्या सुविधांना वाटाण्याच्या अक्षता
By admin | Published: March 25, 2017 1:41 AM