डांबरीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी खोदकाम
By admin | Published: June 22, 2017 12:32 AM2017-06-22T00:32:27+5:302017-06-22T00:32:27+5:30
पनवेल महापालिकेत पाच सिडको नोडचा समावेश आहे. मात्र, महापालिका व सिडको प्रशासनात समन्वय नसल्याने खारघरमधील एका रस्त्याच्या कामावरून दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेत पाच सिडको नोडचा समावेश आहे. मात्र, महापालिका व सिडको प्रशासनात समन्वय नसल्याने खारघरमधील एका रस्त्याच्या कामावरून दिसून येत आहे. केवळ एक दिवस आधी सिडकोने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खोदकाम केले आहे.
कोपरा पुलावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सिडकोने सायन- पनवेल महामार्गाची दुरुस्ती हाती घेतली असून, सोमवारी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, येथून जवळच पनवेल महापालिकेने बांधलेल्या शौचालयाच्या जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले.
संबंधित कंत्राटदाराने ही बाब सिडकोचे अधिकारी बी. एस. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी काम त्वरित थांबवले. मात्र, ऐन पावसाळ्यात खोदकामांना कंटाळलेल्या रहिवाशांना पुन्हा एकदा नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.