पनवेल तालुक्यांतील शाळांचा दुसरा दिवस गेला विद्यार्थ्यांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:43 AM2020-11-25T01:43:59+5:302020-11-25T01:44:22+5:30
ग्रामीण भागातील ३८ खासगी शाळा सुरू, पहिल्या दिवशी एक हजार ४०५ मुले हजर, ८ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह
मयूर तांबडे
नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील ३८ खाजगी शाळा सोमवारपासून सुरु झाल्या. मात्र मंगळवारी विद्यार्थीच हजर नसल्याचे पाहायला मिळाले. पालिका हददीतील शाळा बंद आणि ग्रामीणच्या शाळा मात्र सुरू या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही या संभ्रमात पालक पडले आहेत.
सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील ३८ खाजगी शाळांमध्ये नऊ हजार ४८७ पैकी १ हजार ४०५ विद्यार्थी हजर होते. तर मंगळवारी 38 शाळांमध्ये एकही विद्यार्थी हजर नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात एकूण ५४ खाजगी शाळा आहेत, त्यापैकी ३८ शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र विद्यार्थ्याना शाळेत पाठवण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. पनवेलपालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय आयुक्तानी घेतला आहे. मात्र पनवेल ग्रामीणमध्ये नववी ते बारावीच्या शाळा बंद ठेवण्याचा असा कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असल्याचे दिसून
येत आहे.
पहिल्या दिवशी पालकानी आपल्या पाल्याला शाळेत पाठवले. सुरक्षेची काळजी म्हणून खाजगी शाळेतील जवळपास चारशे शिक्षकांची कोरोना चाचणी केली आहे. यापैकी आठ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे.
ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसा निर्णय रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला हवा होता असे पालकांचे म्हणणे आहे.