सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचा वाद न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:00 AM2020-01-06T00:00:05+5:302020-01-06T00:00:12+5:30
लंडनमधील हाइड पार्कच्या धर्तीवर उभारण्यात येणारा खारघर सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा रखडला आहे.
वैभव गायकर
पनवेल : लंडनमधील हाइड पार्कच्या धर्तीवर उभारण्यात येणारा खारघर सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा रखडला आहे. दुसरा टप्पा विकसित करण्याच्या दृष्टीने सिडकोने काढलेली निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे. दुसरा टप्पा विकसित करण्यासाठी तयारी दर्शविणाºया यश क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सिडकोविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिडकोने केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचे सांगत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
खारघर सेक्टर २३, २४ मध्ये सिडकोने ३० हेक्टर जागेवर सेंट्रल पार्कचा पहिला टप्पा साकारला आहे. याकरिता सुमारे १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा खर्च सिडकोमार्फत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याचे २५ टक्के काम अद्याप शिल्लक आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून पहिल्या टप्प्यासह दुसºया टप्प्याचे काम अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही.
सिडकोच्या वतीने सेंट्रल पार्कची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सेंट्रल पार्कचे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आपल्या कार्यकाळात सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याला गती देण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हा टप्पा विकसित करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात आला.
२०१४ मध्ये याकरिता वित्तीय सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली. या वित्तीय सल्लागार समितीच्या निर्देशानुसार स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये भारतातील दहा अग्रगण्य कंपन्यांचा समावेश असलेल्या चेन्नईस्थित व्हीपीजी युनिवर्सल किंग्डम व यश क्रिएशनने एकत्रित येऊन निविदेत सहभाग घेतला. सिडकोने याकरिता तांत्रिकदृष्ट्या यश क्रिएशनला हिरवा कंदील दाखवत पुढील प्रक्रियेला सुरुवातही केली. हा विषय मंजुरीसाठी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे ठेवण्यात आला. मात्र, गगराणी यांची बदली झाल्याने दुसºया टप्प्याचा विषय आणखीनच रखडला. सध्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी थेट ही प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वर्षभराहून अधिक काळ संबंधित निविदेत भाग घेणाºया कंत्राटदार कंपनीला अंधारात ठेवल्याने संबंधित यश क्रिएशनने सिडकोविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये सिडको महामंडळ, महाराष्ट्र शासन आदींना प्रतिवादी बनविण्यात आले आहे.
याचिकाकर्ते यश क्रिएशनचे संचालक शेखर सावंत यांनी, ही याचिका दाखल केली आहे. सिडकोने सार्वजनिक व खासगी भागीदारीतून दुसरा टप्पा विकसित करण्याचा निर्णय घेतला, याकरिता निविदाही मागविली. आम्ही त्या निविदेला प्रतिसाद दिला. सिडकोने आमची बोलीही खुली केली. संबंधित प्रस्ताव बोर्डाकडे अंतिम मंजुरीला गेला. मात्र, कालांतराने सिडकोने या प्रकरणी चालढकल करीत केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले. यासंदर्भात न्याय मागण्यासाठीच ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
>खारघरवासीयांची स्वप्ने धुळीस
नियोजित दुसºयात टप्प्यात लंडनच्या हाइड पार्कच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय मत्स्यालय, अम्युसमेंट पार्क , वाटर पार्क, स्नो वर्ल्ड, वर्च्युअल रिएलिटी गेम्स, पंचतारांकित हॉटेल्स आणि विशेष म्हणजे खोपोलीचे अॅडलॅब्स इमॅजिकापेक्षा मोठे आणि भव्य पार्क उभारण्याचे सिडकोचे नियोजन होते. मात्र सिडकोने निर्णयच रद्द केल्याने खारघरवासीयांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
>‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’, या तत्त्वावर आधारित काढलेली निविदा सिडकोकडून रद्द करण्यात आली आहे. केवळ एकच निविदा प्राप्त झाल्याने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय सिडको बोर्डाने घेतला आहे. दुसरा टप्पा सिडको स्वत: विकसित करणार असून, याकरिता प्राथमिक स्तरावर सुरुवातील साडेसतरा कोटींचे टेंडर सिडकोने काढले आहे.
- संजय पुदाळे, अभियंता, सिडको खारघर