नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागास यश आले होते. दुसऱ्या लाटेतही झोपडपट्टी परिसरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पाच नागरी आराेग्य केंद्रांच्या परिसरात १०० पेक्षा कमी रुग्ण असून, इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी ३० सक्रिय रुग्ण आहेत. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे यश मिळविणे शक्य झाले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक ठरली आहे. अचानक दुप्पट वेगाने रुग्ण वाढू लागले. प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. रुग्णालयात आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली होती. उपचार वेळेत मिळत नसल्याने मृतांचा आकडा वाढू लागला होता. शहरातील सर्व २३ नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात प्रादुर्भाव वाढू लागला होता. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी ब्रेक द चेन अभियान गतिमान करून प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामधील डाॅक्टरांशी प्रतिदिन ऑनलाइन मिटिंग घेण्यास सुरुवात केली.
आयुक्तांनी सुचविलेल्या उपाययोजना झोपडपट्टी परिसरात काटेकोरपणे राबविण्यास सुरुवात झाली व त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. सिडकाे विकसित नोडमध्ये ५०० ते ७०० रुग्ण आढळून येत असताना झोपडपट्टी परिसरातील पाच नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात १०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.झोपडपट्टी परिसरात आरोग्य केंद्र, विभाग कार्यालय व पोलिसांनी संयुक्तपणे उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांनी खासगी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ महानगरपालिकेस माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांमध्ये नियम पाळण्यासाठी जनजागृती केली. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास पोलीस व विभाग कार्यालयाने कारवाई सुरू केली. या सर्व उपाययोजनांमुळे दिघा, इलठाणपाडा, तुर्भे, चिंचपाडा, कातकरीपाडा, इंदिरानगर परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे.