वाढत्या दुर्घटनांमुळे शहराची सुरक्षा गॅसवर, तीन महिन्यांतील तिसरी घटना; स्फोटाचा रहिवासी वसाहतीला हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:50 AM2017-12-18T01:50:07+5:302017-12-18T01:50:30+5:30
केमिकल कंपन्यांकडून होणा-या निष्काळजीपणामुळे संपूर्ण औद्योगिक पट्टा गॅसवर आला आहे. मागील तीन महिन्यांत अवघ्या तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात तीन मोठ्या कंपन्यांना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्याच रहिवासी क्षेत्रालाही धोक्याची शक्यता निर्माण होत आहे. रविवारी तुर्भे एमआयडीसीत एका रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर सुरक्षेची ही बाब पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : केमिकल कंपन्यांकडून होणा-या निष्काळजीपणामुळे संपूर्ण औद्योगिक पट्टा गॅसवर आला आहे. मागील तीन महिन्यांत अवघ्या तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात तीन मोठ्या कंपन्यांना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्याच रहिवासी क्षेत्रालाही धोक्याची शक्यता निर्माण होत आहे. रविवारी तुर्भे एमआयडीसीत एका रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर सुरक्षेची ही बाब पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ठाणे, बेलापूर औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. सुरुवातीच्या काळात या पट्ट्यातील सुमारे साडेतीन हजार कंपन्यांपैकी बहुतांश रासायनिक कंपन्या होत्या. मात्र, कालांतराने त्यापैकी अनेक कंपन्या बंद पडल्या, तर काही स्थलांतरित झाल्या आहेत. असे असले तरीही सध्या कार्यरत असलेल्या केमिकल कंपन्यांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वारंवार घडणाºया दुर्घटनांवरून स्पष्ट झाले आहे. ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतींसह जवळच्या तळोजा एमआयडीसीतही सुरक्षिततेबाबत हीच उदासिनता असल्याचे समोर आले आहे. मागील तीन महिन्यांत ठाणे, बेलापूर औद्योगिक पट्ट्यात तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. रविवारी ज्या मोडेप्रो कंपनीला आग लागून स्फोट होत होते, त्याच कंपनीपासून काही अंतरावरील मॅकेमको या कंपनीत तीन महिन्यांपूर्वी भीषण आग लागली होती. त्या ठिकाणीही आगीनंतर स्फोटाची मालिका सुरू होती. तर मागील आठवड्यात महापे येथील स्टॉक होल्डिंग या इमारतीच्या भूमिगत असलेल्या तीन मजल्यांवर आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच दिवस अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. तर टीबीआय लगतच असलेल्या तळोजा एमआयडीसीतील टिकिटार कंपनीमध्ये मार्च महिन्यात भीषण आग लागली होती. औद्योगिक पट्ट्यात आगीच्या अशा अनेक घटना प्रत्येक महिन्याला घडत आहेत. त्यापैकी काही आगी नोव्हेंबर ते मार्च यादरम्यानच लागत असल्याने, त्या लागण्याच्या कारणांबाबत साशंकता आहे. मात्र, आगीच्या अशा घटनांमुळे तिथल्या सुमारे तीन लाख कामगार वर्गासह ठाणे, बेलापूर मार्गाच्या दुसºया बाजूचे रहिवासी क्षेत्र धोक्यात आले आहे.
केमिकल कंपन्यांशेजारी पुरेशी मोकळी जागा आवश्यक असतानाही एकामेकाला खेटून सर्व कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये रासायनिक कंपन्यांसह विविध कारखाने आहेत. त्यामुळे एका कंपनीला आग लागल्यास ती लगतच्याही कंपन्यांमध्ये पसरत आहे. यामुळे आगीमध्ये होणाºया वित्तहानीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी बंद कंपन्यांच्या जागी भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहेत. तर बहुतांश कंपन्यांकडून समोरची मोकळी जागाही केमिकलचे ड्रम ठेवण्यासाठी वापरली जात आहे. अशाच प्रकारातून गतवर्षी रबाळे एमआयडीसीमध्ये एका कंपनीला आग लागली होती. अशा घटनांनंतरही सुरक्षेअभावी होणारा हलगर्जीपणा आगीला कारणीभूत ठरत आहे.