सुरक्षा विभागाच्या चौकशीची मागणी

By admin | Published: July 4, 2017 07:18 AM2017-07-04T07:18:21+5:302017-07-04T07:18:21+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षा विभागामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहेत. वशिलेबाजी व आर्थिक हितसंबंधांपुढे

Security Department inquiry sought | सुरक्षा विभागाच्या चौकशीची मागणी

सुरक्षा विभागाच्या चौकशीची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षा विभागामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहेत. वशिलेबाजी व आर्थिक हितसंबंधांपुढे सुरक्षेला दुय्यम स्थान देण्यात आले आहे. ठरावीक अधिकारी-कर्मचारी एकाच मार्केटमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून या विभागाची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एपीएमसीच्या सुरक्षेसाठी कर्नल दर्जाचा मुख्य सुरक्षा अधिकारी, बाजार समितीच्या कायम सेवेत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. ३००पेक्षा जास्त फौजफाटा असताना मार्केट आवाराला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोपरखैरणेमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी सुरक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराविषयी पोलीस आयुक्त, एपीएमसी सचिव, सुरक्षारक्षक बोर्डाचे अधिकारी या सर्वांकडे तक्रार केली आहे.
बाजार समितीमध्ये ठरावीक अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच मार्केटमध्ये कार्यरत आहेत. भाजी, फळ, मसाला मार्केटमध्ये ठरावीक अधिकाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. या तीनही मार्केटमधील आर्थिक हितसंबंधांमुळेच त्या अधिकाऱ्यांची बदली केली जात नाही. बदली केली तरी काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी वर्णी लावली जात आहे. बाजार समितीमध्ये आतापर्यंत संशयित अतिरेकी सापडले आहेत. पैसे घेऊन बाहेरील वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जात आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. बेकायदेशीरपणे येथे दोन ते अडीच हजार परप्रांतीय कामगार ठिय्या मारून बसले असून त्यांना सुरक्षा विभागाचे अभय आहे. मार्केट आवारामध्ये बेकायदेशीरपणे गुटखा विक्री होत असून सुरक्षा विभागाचे कशावरच नियंत्रण राहिलेले नाही.
मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल अविनाश काकडे यांचा वचक राहिलेला नाही. ते फक्त नावालाच मुख्य सुरक्षा अधिकारी असल्याचे जाणवू लागले आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी व प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांमध्येही विस्तव जात नसल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. एपीएमसीमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यास माजी मंत्री व माथाडी नेते शशिकांत शिंदे हे सुरक्षारक्षक बोर्डाकडे मध्यस्ती करून कारवाई थांबवत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
त्याविषयी लेखी माहिती बाळासाहेब शिंदे यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मिळविली आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिनधास्तपणे माया गोळा करू लागले आहेत. सुरक्षा विभागामधील अनागोंदी कारभार तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांचा वचक नाही
बाजार समितीच्या मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर कर्नल दर्जाचे अधिकारी आहेत; परंतु त्यांचा प्रभाव जाणवत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक राहिलेला नाही. अंतर्गत राजकारणामुळे काम करता येत नसल्याचे अनेक वेळा बोलले जात आहे. यापूर्वी एपीएमसीमध्ये कर्नल मोरे हे सुरक्षा अधिकारी असताना त्यांनी कामकाजामध्ये शिस्त आणली होती; परंतु त्यांच्यानंतर एकही अधिकारी सुरक्षा विभागामध्ये शिस्त आणू शकलेला नाही. या विभागातील अर्थकारणामुळे इतर अधिकाऱ्यांचाही यामध्ये हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे.

सुरक्षेपेक्षा पैसा महत्त्वाचा
बाजार समितीच्या सुरक्षेपेक्षा वैयक्तिक स्वार्थाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. यामुळेच बेकायदेशीरपणे रात्री बाहेरील ट्रक आतमध्ये उभे करण्यास परवानगी दिली जात आहे. पार्किंगच्या नावाखाली पैसे वसूल केले जात आहेत. याशिवाय मार्केटमधील अनधिकृत फेरीवाले व इतर अनधिकृत व्यावसायिकांकडूनही पैसे घेतले जात आहेत. आर्थिक हितसंबंधापुढे सुरक्षेला दुय्यम स्थान दिल्याने नाराजी वाढू लागली आहे.



दोषींवर कारवाई नाही
सुरक्षा विभागाला शिस्त लावण्यासाठी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. यापूर्वी ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षक मंडळाकडे परत पाठविण्यात आले होते; परंतु कामगारनेते शशिकांत शिंदे यांनी मध्यस्थी करून कारवाई थांबविण्यास सांगितले होते. भाजी मार्केट व्यापारी महासंघानेही यापूर्वी बदल्या थांबविण्यासाठी प्रशासनाला पत्र दिल्याचे माहितीच्या अधिकारामध्ये समोर आले आहे. हस्तक्षेपामुळे दोषींवर कारवाई होत नसून सुरक्षा विभागाला शिस्त लागत नाही.

कर्मचाऱ्यांचा रूबाब
एपीएमसीमध्ये कायम सुरक्षा रक्षक व सुरक्षारक्षक मंडळाचे कर्मचारी असे दोन प्रकार आहे. कायम अस्थापनेवर असलेल्या सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांपैकी तीन ते चारपट वेतन आहे; परंतु कायम कर्मचारी कामामध्ये निष्काळजीपणा करत आहेत. बोर्डाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रूबाब दाखविण्याचा प्रयत्न करतात.

सुरक्षा विभागात भाजी, मसाला व फळ मार्केटमध्ये वर्षानुवर्षे ठरावीक अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. कारवाई व बदलीमध्ये व्यापारी संघटना, माथाडी नेते व इतर हस्तक्षेप करत असल्याचेही माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रातून उघड झाले आहे. वशिलेबाजी व चुकीच्या गोष्टींमुळे बाजार समितीची सुरक्षा धोक्यात आली असून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी.
- बाळासाहेब शिंदे, तक्रारदार

Web Title: Security Department inquiry sought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.