नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मोरबे ते दिघापर्यंतच्या जलवाहिनीसाठी पामबीच रोडवर ज्वेल्स आॅफ नवी मुंबईजवळ लोखंडी पूल तयार केला आहे. या पुलाचा सांगाडा पूर्णपणे गंजला आहे. वाशी नाल्यामधील पिलरलाही तडे जाण्यास सुरुवात झाली असून, जलवाहिनीची सुरक्षा धोक्यात आली आहे.
शहरवासीयांना पाणीपुरवठा करता यावा, यासाठी नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. मोरबे ते दिघापर्यंत जलवाहिनी टाकली आहे. पामबीच रोडवरून वाशीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीसाठी ज्वेल्सजवळ जवळपास १०० फूट लांबीचा लोखंडी पूल तयार केला आहे. या पुलाचा सांगाडा पूर्णपणे गंजला आहे. सांगाडा बदलण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप याची पाहणीही केलेली नाही. सांगाड्याच्या काही पाट्या पूर्णपणे गंजल्यामुळे भविष्यात जलवाहिनी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथून रोज पाच हजारपेक्षा जास्त नागरिक सकाळी व सायंकाळी चालण्याचा व धावण्याचा व्यायाम करतात. अनेक दक्ष नागरिकांनी पुलाच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त करून प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती केली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वाशी सेंट लॉरेन्स शाळेपासून कोपरीपर्यंत मुख्य नाल्याच्या काठावरून जलवाहिनी गेली आहे. सिमेंटचे पिलर बसवून त्यावर जलवाहिनी ठेवण्यात आली आहे. नाल्यातील पाण्यामुळे जवळपास एक फुटाचा भराव वाहून गेला आहे. अनेक पिलरला तडे जाण्यासही सुरुवात झाली आहे. पिलरचे सिमेंट निघून गेले असून आतमधील लोखंडी सांगाडा दिसू लागला आहे. वारंवार होणारी झिज थांबविण्यासाठी अद्याप महापालिका प्रशासनाकडून कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पामबीच रोडवरील लोखंडी पुलाची झालेली दुरवस्था व वाशीतील पिलरला जाऊ लागलेले तडे पाहून जलवाहिनीच्या मार्गाचे संरक्षणात्मक लेखा परीक्षण करावे, अशी मागणी होत आहे. महापालिकेने शहरात काही ठिकाणी ४५० एमएम ते १२०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे जाळे पसरविले आहे. यासाठी काही ठिकाणी छोटे पूल बांधले आहेत. काही ठिकाणी पिलर तयार करून त्यावर पाइप ठेवले आहेत. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.या पूर्वीही वेधले लक्षमोरबे जलवाहिनीला वाशीमध्ये तडे जात असल्याचे एक वर्षापूर्वी दक्ष नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. या ठिकाणी पाहणी करून दुरुस्तीची कामे करण्याची मागणीही केली होती. नेरुळमधील लोखंडी सांगाड्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आणून दिले होते; परंतु अद्याप त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. दुर्घटना होण्यापूर्वी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जलवाहिनीची नियमित पाहणी केली जाते. वाशी व नेरुळमधील जलवाहिनीची समस्या लक्षात आली आहे. त्या ठिकाणी तत्काळ योग्य उपाययोजना केल्या जाणार असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल.- मनोहर सोनावणे,कार्यकारी अभियंता,मोरबे