दहा लाख प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By Admin | Published: June 27, 2017 03:35 AM2017-06-27T03:35:40+5:302017-06-27T03:35:40+5:30

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे.

Security of ten lakh passengers in the air | दहा लाख प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

दहा लाख प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे. रोडवर सर्वत्र खड्डे पडले असून, निकृष्ट कामामुळे रोज १० ते १५ अपघात होत आहेत. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल व शासनाला शेकडो पत्रे दिली असून तीनही यंत्रणांनी दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिला आहे. या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या दहा लाख प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून, शासकीय यंत्रणा व टोलवेज कंपनीविरोधात असंतोष वाढू लागला आहे.
महामार्गावर उरण फाट्याजवळ चंद्रकांत येशी यांच्या मोटारसायकलला रविवारी पहाटे कंटेनरने धडक दिली. या आपघातामध्ये चंद्रकांत येशी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे महामार्गावरील प्रवास व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून रोडचे रुंदीकरण केले आहे; परंतु ठेकेदाराने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. रोडवर खड्डे पडले असून, उरण फाट्यावरील उड्डाणपुलावरील निसरड्या रोडमुळे रोज अपघात होत आहेत. रुंदीकरण केल्यानंतर या मार्गावरील वाहतूककोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरण फाट्यावरील उड्डाणपुलावर पाऊस सुरू झाल्यापासून रोज किमान दहा अपघात होत आहेत. वाशी गावाजवळ भुयारी मार्गाचे काम अर्धवट राहिले आहे. तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. शिरवणे भुयारी मार्ग व बाजूचा पूर्ण रोड खड्डेमय झाला असून तेथून वाहने चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे, अशी स्थिती आहे. उरण फाटा हा तर मृत्यूचा सापळाच बनला आहे. सीबीडी जंक्शनजवळ अद्याप सिग्नल बसविण्यात आलेला नाही. खारघर ते कामोठेपर्यंतची स्थितीही बिकट असून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल कंपनी या सर्वांना आतापर्यंत शेकडो पत्रे दिली आहेत. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अपघात वाढत आहेत. जीवित व वित्तहानी होत आहे. भविष्यात गंभीर अपघात होऊ शकतात. वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. भुयारी मार्गांचा काहीही उपयोग होत नाही. महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत. आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी पत्रांद्वारे केली आहे. पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी टोलवेज कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या सर्वांच्या अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत; परंतु कोणीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. अखेर उरण फाट्याजवळील उड्डाणपुलावर खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून काम सुरू आहे.
कर्तव्यदक्ष पोलिसाचे कौतुक
महामार्गावरील समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस वारंवार शासकीय यंत्रणेकडे पाठपुरवा करत आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त नितीन पवार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहेत. सीबीडी वाहतूक चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते उरण फाट्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून त्यांनी उरण फाटा उड्डाणपुलावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत ते स्वत: पुलावर उभे राहून काम करवून घेत होते. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे कौतुक होऊ लागले आहे.

Web Title: Security of ten lakh passengers in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.